धामणेच्या 'फ्रेंडशिप मंडळाने' मारली बाजी
'नवक्रांती सरोळी' एक गाव एक गणपती स्पर्धेत प्रथम
आजरा (हसन तकीलदार): स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि गणेश मंडळांच्या शिस्तबद्ध सहकार्यामुळे तालुक्यात गणेशोत्सव अत्यंत शांततेत व डॉल्बीमुक्त वातावरणात पार पडला. याच पार्श्वभूमीवर आजरा पोलीस ठाणे व प्रशासनातर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘गणराया अवॉर्ड’ वितरण सोहळा आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत धामणे येथील फ्रेंडशिप मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा गणराया अवॉर्ड आपल्या नावावर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत यांनी केले. प्रास्ताविक करताना सामंत म्हणाले, गणेशोत्सवापाठोपाठ येणारा नवरात्रोत्सवही डॉल्बीमुक्त होतोय ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. सणांच्या काळात पोलीस यंत्रणेने सुट्टी न घेता अहोरात्र कर्तव्य बजावले. तहसील विभागाने आपत्ती व्यवस्थापन, महावितरणने वीज पुरवठा, नगरपंचायतीने स्वच्छता आणि आरोग्य विभागाने शिबिरांचे आयोजन करून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. सर्व गणेश मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करत डॉल्बीमुक्त व शांततेत उत्सव साजरा केला.
स्पर्धांचे निकाल व विजेते
गणराया अवॉर्ड स्पर्धा: प्रथम क्रमांक: फ्रेंडशिप मित्र मंडळ (धामणे), द्वितीय क्रमांक: शिवसेना प्रणित जयशिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तृतीय क्रमांक: लिंगायत गल्ली मंडळ (आजरा), उत्तेजनार्थ: अवधूत तरुण मंडळ (उत्तूर)
‘एक गाव एक गणपती’ स्पर्धा : प्रथम क्रमांक: नवक्रांती मंडळ (सरोळी), द्वितीय क्रमांक: हनुमान मंडळ (झुलपेवाडी), तृतीय क्रमांक: राजा शिवाजी मंडळ (मलिग्रे), उत्तेजनार्थ: न्यू जयशिवराय मंडळ (विटे)
यावेळी कार्यक्रमात डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करणाऱ्या ६३ गावांचा आणि मिरवणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या क्रेन मालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच परीक्षक म्हणून निष्पक्ष कामगिरी बजावल्याबद्दल वामन सामंत, आरोग्य सेवक युनूस सैय्यद, अमित गुरव आणि ऍड. सचिन इंजल यांचाही नागरी सत्कार करण्यात आला.
प्रशासनाकडून नवरात्रोत्सवासाठी विशेष आवाहन
यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले, गणेशोत्सव मंडळांनी ज्याप्रमाणे शांततेत आणि सहकार्याने उत्सव साजरा केला त्याच धर्तीवर आगामी नवरात्रोत्सवही डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या गजरात शांततेत साजरा करावा. सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत. मिरवणुका दिलेल्या वेळेत पूर्ण कराव्यात, स्वयंसेवक नेमावेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने शक्य तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रशासनाला सहकार्य करावे. नायब तहसीलदार म्हळसाकांत देसाई यांनी शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही डॉल्बीमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश शेटे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता कृष्णा कोळी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, नगरसेवक अनिकेत चराटी, वर्षा बागडी, अर्चना होलम, माधुरी पाचवडेकर, संतोष डोंगरे, प्रदीप नाईक, अबूसईद माणगावकर, शरीफ खेडेकर, महेश पाटील, आनंदा फडके, इस्माईल सोनेखान यांच्यासह तालुक्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

