महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत तुफान ईर्ष्या; गडहिंग्लजमध्ये मंत्री मुश्रीफ यांचे शक्तिप्रदर्शन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) च्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या संचालक मंडळासाठी रविवारी (१८ ऑक्टोबर) अत्यंत चुरशीने आणि ईर्षेने तब्बल ९९.७४ टक्के रेकॉर्डब्रेक मतदान झाले. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ५,४१८ मतदारांपैकी ४,०३२ पुरुष आणि १,३७२ महिला अशा एकूण ५,४०४ सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. उद्या सोमवारी कोल्हापूर येथे मतमोजणी होणार असून सत्ताधाऱ्यांची गदा कायम राहणार की विरोधक बाजी मारणार याचा निकाल उद्या स्पष्ट होणार आहे.
तालुकानिहाय मतदानाची संपूर्ण आकडेवारी
जिल्ह्यातील एकूण १२ तालुक्यांमध्ये पार पडलेल्या या मतदान प्रक्रियेत करवीर (८६५ पैकी ८६५ - १००%), कागल (६१९ पैकी ६१९ - १००%), गगनबावडा (१३१ पैकी १३१ - १००%), चंदगड (४२३ पैकी ४२३ - १००%), पन्हाळा (५१३ पैकी ५१३ - १००%), राधानगरी (६९९ पैकी ६९९ - १००%) आणि शिरोळ (२७० पैकी २७० - १००%) या तब्बल सात तालुक्यांमध्ये १०० टक्के मतदान झाले. तर भुदरगड तालुक्यात ५९३ पैकी ५९१ (९९.६६% - ४३९ पुरुष, १५२ स्त्री), शाहूवाडी तालुक्यात ४४० पैकी ४३९ (९९.७७% - ३३२ पुरुष, १०७ स्त्री), हातकणंगले तालुक्यात १६१ पैकी १६० (९९.३८% - १३१ पुरुष, २९ स्त्री) आणि आजरा तालुक्यात ३०५ पैकी ३०३ (९९.३४% - २१७ पुरुष, ८६ स्त्री) मतदान नोंदवले गेले. तसेच गडहिंग्लज तालुक्यात ३९९ पैकी ३९१ मतदारांनी (९७.९९% - २७० पुरुष, १२१ स्त्री) मतदानाचा हक्क बजावला आहे.
गडहिंग्लजमध्ये ३०० हून अधिक ठरावधारकांसह मुश्रीफ यांचे शक्तिप्रदर्शन
गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलमधील तीन केंद्रांवर सकाळी मंद गतीने सुरू झालेले मतदान दुपारी १२ नंतर वेगाने वाढले. तत्पूर्वी मुत्नाळ येथे नंदाताई बाभुळकर-कुपेकर यांनी ठरावधारकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि उमेदवार सतीश पाटील हे ३०० हून अधिक ठरावधारकांना सोबत घेऊन केंद्रस्थानी दाखल झाले व त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील, असा ठरावधारकांचा उदंड प्रतिसाद आहे. यल्लमा डोंगरावर पॅनल टू पॅनल मतदानाच्या शपथा (अनाभाका) घेण्यात आल्या आहेत. यानंतर कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांना खांद्यावर उचलून विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.
घोषणाबाजी, शिट्ट्यांचा गजर आणि टोप्यांचा रंग!
मतदान केंद्राबाहेर महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांसमोर तुफान घोषणाबाजी सुरू झाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले चिन्ह असलेली 'शिट्टी' वाजवून परिसर दणाणून सोडला. या राजकीय वातावरणात महायुतीचे कार्यकर्ते 'पांढऱ्या टोप्या' तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते 'पिवळ्या टोप्या' परिधान करून लक्ष वेधून घेत होते.
पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि केवळ ओळखपत्र पाहूनच ठरावधारकांना आत सोडले जात होते. गडहिंग्लज केंद्राला मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, भैया माने आदी प्रमुखांनी भेटी देऊन पाहणी केली. आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे आणि 'गोकुळ'च्या भावी सत्ताधाऱ्यांकडे लागले आहे.


