🔘प्रांताधिकाऱ्यांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर
🔘निवेदनात अन्य मागण्यांचाही समावेश

गडहिंग्लज : प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन सादर करताना दलित महासंघाचे पदाधिकारी.(छाया : मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : थोर साहित्यिक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुका दलित महासंघाच्या वतीने राष्ट्रपतींच्या नावे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत आहेत. दीड दिवसाचे शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी महान असा लेखन प्रपंच निर्माण केला. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांचे ग्रंथ, कथा, कादंबऱ्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेले आहेत. जगातील २७ भाषांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे. वाटेगाव (जिल्हा सांगली) येथे जन्मलेले अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, कामगार वर्गासाठी खर्च केले आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये बिनीचे शिलेदार म्हणून त्यांनी आघाडीवर कार्य केलेले आहे. त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्रातील जनमानस जागविला आहे. अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. महाराष्ट्र आणि भारताबाहेरही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असते. एखाद्या लेखकाचा किंवा कलावंताचा असा सन्मान होणे ही एक फार मोठी गोष्ट आहे. अशा या महान लेखक व कलावंताचा योग्य तो सन्मान होण्यासाठी त्यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
याबरोबरच अनुसूचित जाती प्रवर्गातील मातंग समाज हा लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचा समाज आहे परंतु विकासाच्या बाबतीत तो खूपच उपेक्षित राहिला आहे. त्याला विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्याच्या भावी पिढीच्या यशस्वी वाटचालीसाठी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव आयवाळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष सुरेश चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष परशुराम हुले, आजरा तालुकाध्यक्ष शंकर लोखंडे, खजिनदार विजय दावणे, माजी तालुकाध्यक्ष उमेश साठे, तालुका उपाध्यक्ष मारुती अनावरे, विठ्ठलराव कांबळे, गजानन कासारीकर आदींच्या सह्या आहेत
