🔘महागावच्या महात्मा फुले विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम
🔘शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत ईव्हीएम मशीनवर मतदान केल्याची विद्यार्थ्यांना प्रचिती
![]() |
| महागाव : ईव्हीएम मशीनवर मतदान करण्याची प्रचिती घेताना येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनची माहिती देण्यात आली. ईव्हीएम मशीनवर मतदान करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहावयास मिळाला. मोबाईल वरील ॲपद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर मतदान केल्याची प्रचिती आली. शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष कृतीतून माहिती देण्याचा निर्णय येथील महात्मा फुले विद्यालयाने घेत ती यशस्वीपणे राबविण्यात आली.
यावेळी पारंपरिक निवडणुकी ऐवजी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असणारे वोटिंग ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान करून आयान मुगळे याची विद्यार्थी प्रतिनिधी तर रिजा खलिफा व वेदांती सुर्यवंशी विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून देण्यात आले. तसेच प्रत्येक वर्गातून वर्ग प्रतिनिधी निवडून देण्यात आले.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष सुतार यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया व रमेश कळविकट्टे यांनी मोबाईलवरील वोटिंग ॲपवर मॉक पोल व मतदान कसे करावे याविषयी माहिती सांगत प्रात्यक्षिक करून दाखविले.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करत बुधवार दि.२० रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, बुधवार दि.२१ रोजी अर्ज माघार घेऊन चिन्हांचे वाटप केले. शुक्रवार दि.२२ रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली. शनिवार दि.२३ रोजी निकाल घोषित करण्यात आला.
या निवडणूक प्रक्रिया दरम्यान मतदान केंद्र तयार करणे, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्या, मतदार प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडणुकीतून विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली.ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी. एस पाटील,आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक अशोक नांदुलकर यांचे मार्गदर्शन लाभले. रमेश कळविकट्टे, अनिल हलकर्णीकर,संदेश कोकितकर, किरण पाटील यांनी नियोजन केले.
ईव्हीएम मशीनची आगळीवेगळी संकल्पना
ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी मोबाईलच्या साह्याने ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असणारा वोटिंग ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून घेण्यात आला होता. त्यासाठी कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटसाठी दोन मोबाईल ठेवण्यात आले. मतदान अधिकाऱ्याने बॅलेट युनिटवरील बॅलेट सोडल्यानंतर विद्यार्थी मतदारांनी कंट्रोल युनिटवर पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान नोंदवले. त्यावेळी बिपचा आवाज होत होता. यामुळे विद्यार्थ्यांना आपण खऱ्याखुऱ्या ईव्हीएम मशीनवर मत नोंदविल्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.




