🔘गडहिंग्लजला वंचित बहुजन आघाडीचे प्रांताधिकारी यांना निवेदन
🔘शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी
![]() |
| गडहिंग्लज :उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना निवेदन देताना वंचित बहुजनआघाडीचे पदाधिकारी. (छाया : मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच शहरातील नगरपरिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मानवी समाजाच्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण हे मानवी उन्नतीचे मुख्य साधन आहे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन समाजाच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. शैक्षणिक संस्था स्थापन करून शाळा महाविद्यालयांबरोबरच वसतिगृह काढले. त्यामुळेच आज समाजातील मागासलेल्या वर्गाची थोडीफार प्रगती झालेली आहे. समाजातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय मुलांना भरमसाठ फी देऊन शिक्षण घेणे अशक्यप्राय आहे. समाजातील अशा सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांना जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शाळा ह्या एकमेव आधार आहेत. परंतु या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गडहिंग्लज विभागात एकूण ६१ जागा रिक्त आहेत. त्यामुळे मागासवर्गीय मुलांचे प्रचंड नुकसान होत आहे. तरी या जागा तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते एस.आर. कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सुळकुडे, जिल्हा महासचिव भीमराव नंदनवाडे, गडहिंग्लजचे अध्यक्ष अर्जुन दुंडगेकर आदींच्या सह्या आहेत.

