🔘तेरणी हद्दीतील रस्त्यावर जीवघेणे खड्डे
🔘साईडपट्ट्या खचल्या
🔘खड्ड्यांसह साईड पट्ट्यांमध्ये साचले पावसाचे पाणी
🔘रस्त्याची डागडुजी करण्याची गरज
🔘दुरुस्तीसाठी मोठ्या अपघाताची वाट पाहणार का?
🔘नागरिकांचा संतप्त सवाल
![]() |
| तेरणी : हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ मधोमध लांबलचक पडलेला खड्डा. |
गडहिंग्लज (संतोष नाईक) : तेरणी- हलकर्णी रस्ता पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तेरणी गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. वाहनधारकांना या रस्त्यावर मोठी कसरत करत वाहने हाकावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांमुळे व खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
काही महिन्यापूर्वी एका खासगी मोबाईल कंपनीचे केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या साईड पट्ट्यांची खोदाई करण्यात आली होती. केबल टाकण्याचे काम झाल्यानंतर या साईड पट्ट्या पुन्हा माती टाकून मुजविण्यात आल्या होत्या. मात्र केवळ मातीचाच भराव टाकला गेल्याने या साईड पट्ट्या पुन्हा खचले आहेत. एकीकडे रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे व दुसरीकडे खचत चाललेल्या साईड पट्ट्या यामुळे वाहन धारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एखादे मोठे अवजड वाहन आल्यास समोरून येणाऱ्या अन्य वाहनाला काळजीपूर्वक वाहन हाकावे लागते. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात साईड पट्ट्यांवर चाक गेल्यास रुतण्याचाही धोका जास्त आहे. मध्यंतरी ऊस वाहतुकीची काही वाहने या साईड पट्ट्यांमध्ये चाक रुतल्याने अडकलेल्या घटनाही घडले आहेत. मध्यंतरी साईड पट्ट्या खोदल्यानंतर माती रस्त्यावर येऊन रस्ता निसरडाही बनला होता. परिणामी बरेच दुचाकीस्वार या रस्त्यावर घसरून पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
![]() |
| तेरणी : देसाई यांच्या घराजवळ रस्त्यावर पडलेला मोठ्या आकाराचा जीवघेणा खड्डा |
![]() |
| तेरणी : साईडपट्ट्या खचल्याने साचलेले पावसाचे पाणी |
पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करण्याची गरज होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांचा आकारही वाढला आहे. मोठा पाऊस झाल्यास रस्ता वाहून जाण्याचाही धोका आहे. संबंधित विभागाने तातडीने डागडुजी करून रस्ता वाहतुकीस निर्धोक करावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.
रस्त्याची झालेली अवस्था छायाचित्राच्या माध्यमातून






