🔘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
🔘कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाचे निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी आपण मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची लवकरच भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर होते. विशेष विमानाने कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर विमानतळावर कोल्हापूर खंडपीठ कृती समिती व जिल्हा बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील पक्षकार, वकिलांचे कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे अशी आग्रही मागणी आहे, याची कल्पना आम्हाला आहे. या पार्श्वभूमीवर आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती यांची भेट घेऊन कोल्हापूर येथे खंडपीठ होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन देण्यात आले.

