राखी पाठविण्यासाठी पोस्ट विभागाकडून वॉटरप्रूफ लिफाफ्यांची निर्मिती
नवी दिल्ली (सौजन्य : पी. आय.बी): ११ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट विभागाने वाटरप्रूफ आकर्षक अशा विशेष लिफाफ्यांची निर्मिती केली आहे.
टपाल खात्याच्या दिल्ली मंडळाच्या कार्यालयाने उच्च दर्जाच्या राखी लिफाफ्यांच्या विक्रीसाठी दिल्लीतील टपाल कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था केली आहे. हे लिफाफे वजनाला हलके, वॉटर प्रूफ, न फाटणारे, मजबूत आणि उत्कृष्ट मुद्रण केलेले आहेत.या लिफाफ्यांसाठी वापरण्यात आलेला कागद वैशिष्ट्यपूर्ण असून हे लिफाफे पाण्याने खराब होणार नाहीत तसेच ते फाटणार नाहीत. हे राखी विशेष लिफाफे 11 cms × 22cms अशा सोयीस्कर मापाचे असून सहज सील करण्यासाठी पील-ऑफ स्ट्रिप सील यंत्रणेचा वापर केलेले हे लिफाफे आकर्षक डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत.
या राखी लिफाफ्यांची किंमत देखील १५ रुपये प्रति लिफाफा अशी किफायतशीर आहे. दिल्लीच्या टपाल कार्यालयांमध्ये राखी लिफाफ्यांची विक्री आधीच सुरू झाली आहे.

