Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"सिंबायोसिस"मध्ये पुस्तक संकलनाचा अनोखा उपक्रम

🔘डॉ. शां.ब.मुजुमदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपक्रमाची सुरुवात

🔘ग्रंथभेटीतून जुन्या ११०० पुस्तकांचे संकलन

हरळी बुद्रुक: पुस्तक संकलनावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी.

गडहिंग्लज ( प्रतिनिधी):
पुस्तकं जीर्ण होऊ शकतात किंवा फाटू शकतात पण त्यामधील आशय व विचार हे नेहमीच चिरतरुण व नवनवीन माहिती देणारे असतात त्यामुळे हाच विचार डोळ्यासमोर ठेवत सिंबायोसिस स्कूल्स मध्यवर्ती संचालनालय अर्थात एस.एस.सी.डी.च्या मार्गदर्शनात सिंबायोसिस स्कूल हरळी बु।। येथील ग्रंथालय विभागामार्फत  जवळपास ११०० जुन्या पुस्तकांचे संकलन करण्यात आले. 

पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलेले सिंबायोसिस संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 'पुस्तक जुने विचार नवे' या उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. घरी कपाटात पडून असणारी , सद्यस्थितीत जी वाचनात नाहीत किंवा वाचून झाली आहेत अशी अनेक जुनी पुस्तके हरळीसह पंचक्रोशीतील पालक, आजी-माजी विद्यार्थी, हितचिंतक व ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे भेट दिली व या माध्यमातून डॉ. शां. ब. मुजुमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भेट दिलेल्या विविध प्रकारच्या या पुस्तकात मराठी,हिंदी,इंग्रजी,संस्कृत व कन्नड भाषेतील पुस्तके असून यात बालसाहित्य, वाङ्मय, कादंबरी, कथासंग्रह, कविता, मासिके अशा अगदी ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या जुन्या पुस्तकांचा समावेश आहे. आजच्या काळात अशी दुर्मिळ पुस्तके सहजपणे कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात उपलब्ध होत नाहीत किंवा मिळतही नाहीत त्यामुळे अशी दुर्मिळ व अमूल्य पुस्तके या निमित्ताने ग्रंथालयात उपलब्ध झाली आहेत. अनेकांच्या घरी कपाटात किंवा अडगळीत पडून आहेत अन जी वाचनात नाहित किंवा वाचकाच्या प्रतीक्षेत आहेत अशा पुस्तकांना आता ग्रंथालयाच्या माध्यमातून नवी झळाळी मिळणार आहे. एकप्रकारे या उपक्रमाद्वारे जीर्ण व फाटून जाणारे किंवा रद्दी म्हणून कवडीमोल किंमतीला विकल्या जाणाऱ्या जुन्या पुस्तकांचे जतन केले जाणार आहे. 

हरळी बुद्रुक: पुस्तके स्विकारताना ग्रंथालय विभाग प्रमुख संतोष आंबी.
या उपक्रमासाठी शाळेच्या ग्रंथालय विभागामार्फत गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांसह, आजी-माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतकांना जुनी पुस्तके देण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहानास प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या घरी असणारी नवी-जुनी पुस्तके शाळेच्या ग्रंथालयास भेट दिली. या उपक्रमाबद्दल सिंबायोसिस संस्थेच्या संचालिका सौ. संजीवनी मुजुमदार यांनी कौतुक केले तर प्रधान संचालिका डॉ.विद्या येरवडेकर यांचे प्रोत्साहन लाभले.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  एसएससीडीचे प्रमुख डॉ. गार्गी मित्रा , निबंधक मिलिंद चौधरी व मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी मार्गदर्शन केले तर शालेय विद्यार्थ्यांसह ग्रंथालय विभाग प्रमुख संतोष आंबी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुस्तक संकलनावेळी आयोजित कार्यक्रमास अरुण हरळीकर, रेणुका परीट, राजराम पाटील, अमर कांबळे,संजय पाटील, अशोक गुरव, छाया खवरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून यानिमित्ताने जुन्या पुस्तकांची जोपासना होऊन शालेय विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे हे नक्की.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.