Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय कम्युनिस्टांनी ब्रिटिशांच्या साम्राज्यशाहीला सुरुंग लावला: डॉ.राजेंद्र गुंडे

गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. राजेंद्र गुंडे (छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी)
:  ब्रिटीश साम्राज्य उलथवून टाकण्यात कम्युनिस्टांनी मोलाची भूमिका बजावली. ब्रिटीश सत्ता नेस्तनाबूत  करून लोकशाही मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, भारतातील जमीनदार व भांडवलदार यांच्या जुलुमाविरुद्ध आवाज उठवून त्याचे समूळ नष्ट करण्यासाठी कम्युनिस्टांनी लढा दिला आहे. साम्यवाद व मार्क्सवादी विचाराने प्रेरित झालेले भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांसारखे अनेक क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. असे प्रतिपादन डॉ.राजेंद्र गुंडे यांनी केले.

 येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या व्याख्यानमालेत बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एम. कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉ.ए.एम.हसूरे यांनी केले. यावेळी भारतीय स्वातंत्र्य आणि साम्यवाद' या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.गुंडे म्हणाले, कम्युनिस्टांनी क्रांतीकारकांची चळवळ उभी केली. १९२० मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची संघटना स्थापना झाली. या संघटनेच्या माध्यमातून ब्रिटीश राज्य नष्ट करून भारत स्वतंत्र करणे, जमीनदारांचे निर्मुलन करणे, भारतीय संघराज्याची स्थापना करणे ही उद्दिष्टे होती. कम्युनिस्टांनी जमिनदार व भांडवलदारांच्या शोषणवृत्तीला विरोध करून जुलुमी साम्राज्यशाहीचा खरा बिमोड केला. ब्रिटीशांच्या साम्राज्यवाद विरोधात शेतकऱ्यांनी देशभर अनेक आंदोलने  केली आणि जुलुमी सत्तेला सुरुंग लावला असल्याचे डॉ.गुंडे यांनी सांगितले. शेतकरी व कामगार यांच्या माध्यमातून देशभर वेळोवेळी आंदोलने करून ब्रिटिशांना खिळखिळे केले. नऊ ऑगष्ट १९४२ रोजी काँग्रेस पुढार्‍यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकल्यानंतर मुंबईसह संपूर्ण देशभर आक्रमक करून विध्वंसक घटना घडविल्या गेल्या. अशा या कम्युनिस्टांची वाढती ताकत रोखण्यासाठी व त्यांच्या भीतीपोटी ब्रिटिशानी पेशावर कटाचे पाच खटले कानपूर-बाल्सेव्हिक  कटाचा खटला व बहुचर्चित १९२० मधील मीरत कटाचा खटल्याच्या माध्यमातून दबाव आणला तरीदेखील ही चळवळ पुढे गतिमानतेने कार्यरत राहिले असल्याचे डॉ.राजेंद्र गुंडे यांनी सांगितले.

रसायनशास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.