सेना मेडल सुभाष इंगळे, सुभेदार मेजर हरिबा जाधव, सुभेदार मेजर एन.के.पाटील यांनी केले कथन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवराज महाविद्यालयात सैन्य दलातील चित्तथरारक अनुभवांचे कथन सेना मेडल सुभाष इंगळे, सुभेदार मेजर हरिबा जाधव, सुभेदार मेजर 'एन.के.पाटील यांनी कथन केले. येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व
प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. तानांजी चौगुले यांनी केले. या कार्यक्रमात 'सैन्य दलातील चित्तथरारक अनुभव कथन करताना सेना मेडल सुभाष
इंगळे यांनी भारतीय सैन्यामध्ये जे ट्रेनिंग दिले जाते ते सैनिकांची उमेद
वाढविणारी आहे. आर्मीमध्ये कारगिल सारख्या पहाडी प्रदेशात लढताना सैनिकांना मोठी कसरत करावी
लागते. येणाऱ्या अडचणींवर मात करीत शत्रूवर हल्ला चढविण्यासाठी भारतीय सैनिकांनी प्राणांची
बलिदान दिले आहे. सियाचीनसारख्या बर्फाळ प्रदेशात निकराने लढण्याची क्षमता भारतीय सैनिकांमध्ये आहे. कारगील लढाईकडे आम्ही
ऑपरेशन विजय म्हणून पाहतो. लढाईमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सैनिकांना शत्रूशी झुंजावे लागते.
काही पहाडी इलाख्यामध्ये उग्रवादी अथवा आतंकवादी लपून बसलेले असतात अशावेळी स्थानिकांच्या मदतीने त्या उग्रवादी,
आतंकवादींना हेरून त्यांच्यावर करवाई करताना अनेक
अडचणींना सामोरे जावे लागते. जवान व्हायचे असेल तर मानसिक व शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे असेही
सेना मेडल सुभाष इंगळे यांनी सांगितले.
सुभेदार मेजर एन.के.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय सेना ही जगात एकमेव अशी सक्षम सेना आहे. भारतीय जवान आपल्या प्राणांची बाजी लावून लढत असतो. जवानांमध्ये उर्जा निर्माण करण्याचे कार्य आर्मी करीत असते. सीमेवर वीस वर्षे जीवाची बाजी लावून लढताना आलेले अनुभव त्यांनी येळी कथन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. ग्रंथालय विभाग यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास डॉ. बी. डी. अजळकर, डॉ. मनमोहन राजे, डॉ.आनंदा कुंभार, डॉ. जी. जी. गायकवाड, ग्रंथपाल संदीप कुराडे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तानाजी भांदुगरे यांनी केले. आभार प्रा. सौ.बिनादेवी कुराडे यांनी मानले.



