🔘रस्त्याची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल
🔘चिखलातून वाट तुडवत करावे लागते मार्गक्रमण
🔘शालेय विद्यार्थ्यांचीही रस्त्या अभावी होत आहे कुचंबना
🔘रुग्णांचेही होत आहेत हाल
🔘रहिवाशांचे ग्रामपंचायतीला निवेदन सादर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव अंतर्गत असणाऱ्या विविध वाड्या वस्त्यांकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाले आहे. रस्त्यात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्याने येथील रहिवाशांचे रस्त्याअभावी मोठे हाल होत आहेत. दरम्यान या समस्येकडे येथील रहिवाशांनी शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला निवेदन सादर करून याकडे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव पैकी इजिमा क्रमांक १२२ पासून राजमाने वसाहत, मूकनावरवाडी, कोरेकोडोली वसाहत, घोलराखे तळ ते इजिमा १२३ ला मिळणारा रस्ता, वीरभद्र मंदिर, मूकनावरवाडी ते बालाजी मंदिर पर्यंतचा दोन किलोमीटरचा रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून यावरून रहदारी करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यावरून वाडी शाळा क्रमांक २ कडे जाणाऱ्या मुलांचे मोठे हाल होत आहेत. रस्ता चिखलमय झाल्याने मोठी कसरत करत चिखलाची वाट तुडवत मुलांना शिक्षणासाठी ये जा करावे लागत आहे.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व येथील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला गडहिंग्लज बाजारपेठेत नेण्यासाठी व आपल्या शेतीकडे ये-जा करण्यासाठी या चिखलमय रस्त्यांमुळे मोठी कुचंबना होत आहे.
या ठिकाणी रात्री अपरात्री एखाद्या रुग्णाला दवाखान्यासाठी न्यावयाचे झाल्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे तर दूरचीच गोष्ट पायी चालणे सुद्धा मोठे कष्टाचे होत आहे. या भागातील घुगरे, चाळूगोळ , कारगुपी, गोरुले, देसाई कौजलगी,गोरले, मूकनावर वाडीतील नागरिकांना रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे अशी जोरदार मागणी येथील रहिवाशांनी या निवेदनातून केली आहे.
![]() |
| भडगाव: शिवसेनेचे कार्यकर्ते वसंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला निवेदन देताना या भागातील रहिवाशी. |
या निवेदनावर वसंत नाईक, मल्लिकार्जुन चौगुले, दयानंद पट्टणकुडी, लक्ष्मण करगुपी, शंकर देसाई यांच्यासह या भागातील रहिवाशांच्या सह्या आहेत.
या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा




