🔘गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश ताशिलदार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांचे निवेदन
या निवेदनात म्हटले आहे की, बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना ग्रामपंचायतकडे नळ कनेक्शन घेतेवेळी नळ कनेक्शन डिपॉझिट प्रत्येकी रक्कम १ हजार ग्रामपंचायतीने भरून घेतलेली आहे. शासनाकडून हद्दवाढ होऊन गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. हद्दवाढ झाल्यानंतर शासन नियमाप्रमाणे ग्रामपंचायतीकडील मालमत्ता, संबंधित लेखे, दस्तऐवज त्याचप्रमाणे आर्थिक देवाण-घेवाण त्यामध्ये इमारत कर, पाणीपट्टी रक्कम, नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम, त्याचप्रमाणे इतर सर्व प्रकारचे मालमत्ता हस्तांतरित होणे आवश्यक होते. तथापि ग्रामपंचायतकडून फक्त इमारत कर व पाणीपट्टी थकबाकी नगरपालिकेकडे वळवल्यामुळे नगरपालिकेने सदरची रक्कम वसूल केले आहे. परंतु ग्रामस्थांची नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम ग्रामपंचायतीने नगरपालिकेकडे वर्ग न केल्यामुळे सध्या नगरपालिका नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम वसूल करून घेतले आहे. तसेच काही ग्रामस्थांचे नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम न दिल्याने काहींचे नळ कनेक्शन तोडले आहेत. त्यामुळे नाईलाजाने नागरिकांना पुन्हा डिपॉझिट रक्कम नगरपालिकेकडे भरावी लागली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप व नाहक त्रास सहन करावा लागला आहे. वास्तविक हद्दवाढ झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सर्व ग्रामस्थांचे नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम ग्रामपंचायतीकडून हस्तांतरित करून घेणे क्रमप्राप्त होते, मात्र त्यांनी व ग्रामपंचायतीने कोणतीही योग्य कार्यवाही केलेली नाही. याबाबत अनेकवेळा नगरपालिका व ग्रामपंचायतीने वेळोवेळी तोंडी व लेखी कळविले होते. परंतु याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. पाठपुरावा करून देखील नळ कनेक्शन डिपॉझिट रक्कम न दिल्यामुळे पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश ताशिलदार, प्रकाश पाटील, अक्षय शिंदे,राहुल आडावकर, वैशाली आडावकर, शिवराज पाटील,अझर बोजगर, साक्षी आडावकर, सौ.गंगुबाई ताशिलदार, सौ.आशालता सुतार, सौ.सविता ताशिलदार, सौ. मंगल पोतदार यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

