Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत- ऑस्ट्रेलिया शिक्षण क्षेत्रात सहकार्य वाढविणार

🔘केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक 

🔘भारत- ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या बैठकीत क्लेअर यांच्यासोबत सहअध्यक्ष म्हणून सहभागी 

🔘शिक्षण व कौशल्यविकासाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत एकमत

🔘ऑस्ट्रेलियन शिक्षणसंस्थांना भारतात शिक्षण परिसर उभे करण्यासाठी केले आमंत्रित

🔘भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रलंबित व्हिसाचा मुद्दा उपस्थित


नवी दिल्‍ली (सौजन्य: पीआयबी):
केंद्रीय शिक्षण व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. तसेच पश्चिम सिडनी विद्यापीठात (WSU) भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषदेच्या (AIEC) ६ व्या बैठकीत क्लेअर यांच्यासोबत सह अध्यक्ष म्हणून सहभागी झाले. शिक्षण क्षेत्रात भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन, नवोन्मेष तसेच उद्योजकतेच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासंबंधात अतिशय फलदायी चर्चा केली. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ऑस्ट्रेलियन विद्यापीठे व कौशल्य विकास संस्थांना भारतात शिक्षण परिसर उभे करण्यासाठी तसेच भारतीय शिक्षणसंस्थांशी सहकार्य करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी आमंत्रित केले. प्रधान यांनी महामहिम जेसन क्लेअर यांना या वर्षाअखेरीस भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.

अध्ययन, कौशल्य विकास आणि संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत एकमत झाले. भारत- ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान धोरणात्मक व सर्वसमावेशक भागीदारीमध्ये शिक्षणक्षेत्राचा मोठा वाटा असेल.

शिक्षण, कौशल्य विकास, व संशोधन क्षेत्रात दोन्ही देशांचे संबंध मजबूत होण्यासाठी भारत ऑस्ट्रेलिया शिक्षण परिषद (AIEC) हे उत्तम व्यासपीठ असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी  बैठकीत सांगितले. परिषदेची सातवी बैठक पुढील वर्षी भारतात घेण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियन पथकाला आमंत्रित केले.

आयुर्वेद, योग, कृषिक्षेत्र, इत्यादी क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे संशोधन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. कौशल्य प्रमाणीकरण, तसेच खनिकर्म, दळणवळण व्यवस्थापन, इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताने डिजिटल विद्यापीठ आणि गतिशक्ति विद्यापीठ स्थापन केले असून त्यांचे पाठ्यक्रम विकसित करण्यासोबत इतर अनेक बाबतीत दोन्ही देशांना एकत्रितपणे प्रयत्न करता येतील , असे त्यांनी सुचवले.

ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा प्रलंबित असल्याचा मुद्दाही प्रधान यांनी यावेळी उपस्थित केला. हे व्हिसा लवकरात लवकर दिले जातील असे आश्वासन ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी दिले. त्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दोन्ही देशांमधील शिक्षणविषयक नियमांची माहिती करून घेत दोन्ही देशांमधील शिक्षणसंस्थांचे परस्पर सहकार्य व आदानप्रदान कसे वाढवता येईल यावर काम करणाऱ्या एका कृतिगटाची स्थापना करत असल्याचे त्यांनी घोषित केले. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी शिक्षण, कौशल्यविकास व संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाशी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे व त्यासाठी ज्ञानसेतूची निर्मिती करणे यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे प्रधान यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.