गडहिंग्लज ( प्रतिनिधी):'संकेश्वर - बांदा महामार्ग प्रकल्प शेतकरी संघटनेची' स्थापना करण्यात आली. खेडे (तालुका- आजरा) येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
संघटनेच्या प्रमुख पदी कॉम्रेड शिवाजी गुरव, सचिव पदी गणपती येसणे, खजानिस-जयवंत थोरवत, हिंदुराव खोराटे, शिवाजी इंगळे ,पांडुरंग पवार ,सौ.विद्या कातकर ,अनिल खोराटे, जयसिंग चव्हाण, दत्तात्रय कदम, दत्तात्रय नेसरकर, रवींद्र जाधव यांची सदस्य पदी नेमणूक केली आहे.
संकेश्वर ते बांधा या नियोजित महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये शिवाजी गुरव म्हणाले, शेतकऱ्यांना विश्वासात घेतला नाही तर प्रकल्प पूर्ण होणार नाही महामार्ग होण्याला आमचा विरोध नाही ;मात्र शेतकऱ्यांची जमीन घेताना बाजार भावाप्रमाणे किंमत दिली पाहिजे. गणपती येसणे यांनी आमच्या जमिनी आमच्या नावावर आहेत त्यातून साईड पट्टी आहे, मोबदला दिल्याशिवाय पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला. जयवंत थोरवत यांनी आभार मानले.
त्यानंतर शिष्टमंडळ तहसील कार्यालय आजरा येथे जाऊन निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये बैठक घेण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा 6 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


