राधानगरी ते फेजिवडे दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था
मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन
बांधकाम विभाग व कंपनीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
डिसेंबर अखेरपर्यंत रस्त्याचे काम करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निपाणी- देवगड राज्यमार्गावरील राधानगरी ते फेजिवडे दरम्यानचा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्ता मंजूर असूनही गेले चार वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संबंधित विभागाने काम सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभाग व कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. निपाणी- दाजीपूर या सत्तर किलोमीटरच्या रस्त्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध असून कंपनीकडून धीम्या गतीने काम सुरू आहे. रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. निपाणी- देवगड राज्यमार्ग हा तळ कोकणासह गोव्याला जोडणारा सोयीस्कर मार्ग आहे. या मार्गावर अवजड वाहनांसह इतर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. राधानगरी पावसाचे आगर म्हणून ओळखले जाते. गेल्या दोन वर्षात या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत. काहीजणांना अपंगत्व आले आहे. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी या रस्त्यासाठी अनेक आंदोलन झाली मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी येतात आणि काम सुरू करतो असे आश्वासन देतात. या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही या रस्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी केला.
तीन तास केलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले, तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण,गट नेते युवराज येडुरे, जिल्हा उपाध्यक्ष रोहण निर्मळ, अशोक पाटील, शहराध्यक्ष राजेश पाटील, डी.जी. चौगले, तालुका उपाध्यक्ष रोहित कानकेकर, उतम चव्हाण, सौरभ पोवार, रणजित पाटील, प्रवीण मनुगडे, सागर शेळके, राहुल कुंभार, प्रशांत सनदी, उमेद निल्ले, प्रकाश चव्हाण, पांडुरंग चव्हाण, ऋतुराज चव्हाण, ओंकार चव्हाण, जयसिंग चव्हाण, आदित्य चव्हाण. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

