गडहिंग्लज (प्रतिनिधी): गुरुवर्य गुरलिंगया स्वामी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल मुगळी येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.सिंबायोसिस स्कूलचे माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे म्हणाले, पन्नास वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षकाची नोकरी करीत समाज सुधारण्याचे ध्येय बाळगून आदर्श जीवन जगणाऱ्या गुरुवर्य स्व. गुरुलिंगया शिवया स्वामी यांच्या विचारांचा आदर्श जपत स्वामी कुटुंबीयांनी मुगळी गावात अनेक विधायक उपक्रम राबविले. स्वर्गीय स्वामी गुरुजींचे विचार भावी पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. पन्नास वर्षांपूर्वीची शिक्षण पद्धती आणि आज बदलणारी शिक्षण पद्धती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण पद्धती बदल होताना वाचन संस्कृतीला बळ देण्याचे आवाहन केले. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत वाचनाला अत्यंत महत्त्व असून शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थी वर्गात वाचनाची आवड निर्माण करावी. असे आवाहन त्याने विद्यार्थ्यांना केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्यादेवी लोहार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी निजगुणी स्वामी, मुगळीचे सरपंच बी.जी. स्वामी, जरळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक टी. एम. दुंडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत भोसले, महाडिक यांची भाषणे झाली. गुरुवर्य गुरुलिंगया स्वामी यांच्या आदरांजली विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब महाडिक, रामया स्वामी, एस.बी.कांबळे, एस. एस. खडकेकर, एम. डी. रणनवरे, पी. पी. महाजन, एम. आर. शिंदे, अनिल शिंत्रे, दत्तात्रय संघमित्र, प्रशांत कडलगे,श्रीपाद स्वामी, के.डी. धनवडे, सचिन ओहरा यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. पी. आय.कंदगल यांनी सूत्रसंचालन केले.आभार एस के सागर यांनी मानले.



