![]() |
| (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष माजी आमदार पन्नालाल सुराणा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पन्नालाल सुराणा म्हणाले, विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. महात्मा गांधी यांच्या 'निर्भय बनो, एकला चलो रे आणि अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करा ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी आचरणात आणावी असे आवाहन त्यांनी केले. साधी राहणी व उच्च विचारसरणी अंमलात आणणारे लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा आढावा घेतला. श्री सुराणा यांनी या दोन महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणावे असे स्पष्ट केले.
यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी शासनाच्या सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येणार असल्याचे सांगितले. राष्ट्र सेवा दलाचे हसन देसाई, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.एम.हसुरे, नॅक कोऑर्डिनेटर प्रा. किशोर आदाटे, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. ए. जी. नाईकवाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस. एम. हसुरे यांनी आभार मानले.



