चालकाने प्रसंगावधान राखत बस शेजारच्या मोकळ्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसवल्याने मोठा अनर्थ टळला
बेळगाव : बेळगाव शहरातील आरटीओ सर्कल जवळ एका खासगी आराम बसची ब्रेक फेल झाल्याने गोंधळ उडाला. ही बस नजीकच असणाऱ्या एका मोकळ्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसली. चालकाने प्रसंगावधान राखत सदर बस मोकळ्या इमारतीच्या कंपाऊंडमध्ये घुसवल्याने मोठा अनर्थ टळला.
सकाळच्या वेळी या रस्त्यावर पादचारी व इतर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. मात्र या ब्रेक फेलच्या थराराने सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला.
याबाबतची अधिक माहिती अशी, सदर आराम बस सकाळी चेन्नम्मा सर्कलकडून येत असताना अचानक ब्रेक फेल झाला. गांभीर्य लक्षात घेऊन सदर बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत त्याने नजीकच्या रिकाम्या इमारतीत ही बस धडकवली. या धडकेने बसचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. घटना समजताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते.

