Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आमच्या मूळ जमिनींची पहिल्यांदा मोजणी करा, मगच हात लावा!

संकेश्वर- आंबोली महामार्ग संदर्भातील बैठकीत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

पाचपटच भरपाई हवी, दुप्पट आम्हाला मान्य नाही: राजेंद्र गड्यानावर 

मोजमाप झाल्याशिवाय इंचभर  जमिनीलाही हात लावू देणार नाही : कॉम्रेड शिवाजी गुरव

संकेश्वर- आंबोली महामार्ग हा दुपदरी होणार : कार्यकारी अभियंता मुधाळे

सार्वजनिक बांधकाम विभागासोबत दोन दिवसात बैठकीचे आश्वासन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
आमच्या मूळ जमिनींची मोजणी केल्याशिवाय महामार्गाच्या कामासाठी इंचभर जमिनीलाही हात लावू देणार नाही असे सांगत दुप्पट भरपाई आम्हाला मान्य नसून रेडीरेकनर प्रमाणे पाचपट भरपाई देणार असाल तरच आमच्या जमिनी संपादित करा अन्यथा कोणत्याही प्रकारचे भूसंपादन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा संकेश्वर- आंबोली महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी बैठकीत घेतला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.डी.मुधाळे यांनी दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.   

संकेश्वर-आंबोली- बांदा महामार्गात बाधित शेतकरी व अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक गडहिंग्लज येथील शाहू सभागृहात पार पडली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर, महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी शेतकऱ्यांची बाजू अधिकाऱ्यांसमोर आक्रमकपणे मांडत ठोस निर्णय झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा दिला. या बैठकीस उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे  कार्यकारी अभियंता के.डी.मुधाळे, टी.एस. शिरगुप्पे उपस्थित होते.


यावेळी बोलताना राजेंद्र गड्यानावर म्हणाले, या महामार्गात येणारी विविध गावे, वसाहती, घरे, जमिनी यांचा सारासार विचार करणे गरजेचे आहे. रस्ता करत असताना  पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या जमिनीची हद्द मोजण्यात यावी  मगच अधिग्रहण करावे. रस्त्याला आमचा विरोध नाही मात्र शेतकऱ्यांना भकास करून जर विकास करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. हा मार्ग बऱ्याच ठिकाणी काही नागरिकांच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत जाणार असल्याने गटारीचे पाणी  त्यांच्या घरात शिरणार आहे त्यामुळे त्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे. गावच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल होणार का याचीही स्पष्टता हवी. या मार्गात कोणत्या गावातील शेतकऱ्याची जमीन घरे कोणाची व किती जाणार याचा तपशील ज्या त्या गावात प्रसिद्ध करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली.

मूळ मालकांच्या जमिनीची मोजणी होऊन योग्य तो मोबदल्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम थांबविण्यात यावे. या महामार्गासाठी  सध्या सुरू असलेले खोदाखोदी बंद करण्यात यावी. सुस्थितीत असलेला रस्ता खराब करण्यात येऊ नये याकडे लक्ष वेधत रस्त्याची डागडुजी करून महामार्गाचे काम थांबविण्यात यावे अशी सूचना  श्री गड्यानावर यांनी केली. या संदर्भात पुन्हा एक व्यापक बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जिथे भूमी अधिग्रहणाचा प्रश्नच येत नाही तेथे आम्ही काम करू हे धोरण आम्ही खपवून घेणार नाही. काम सुरू केल्यास प्रसंगी उधळून लावू. वारंवार काम बंद पाडण्यास  व आंदोलने करण्यास आम्हाला वेळ नाही योग्य निर्णयप्रत येऊन बाधित शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा मगच काम सुरू करण्यात यावे असा खणखणीत इशारा श्री. गड्यानावर यांनी दिला.

यावेळी बोलताना संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव म्हणाले, हा मार्ग दुपदरी होणार असल्याचे सांगता, तथापि  भविष्यात टोल द्यावा लागणार असेही सांगितले जात आहे, मग हा रस्ता चारपदरीच आहे?अशी शंका त्यांनी व्यक्त केली. वनखात्याच्या हद्दीतील एक झाड तोडल्यास दहा झाडे लावू असे लिहून देण्यात आले आहे. मात्र नंतर ही झाडे शेतकऱ्यांच्या हद्दीतच लावणार का? त्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या मूळ जमिनींचे मोजमाप झाल्याशिवाय इंचभरही  जमिनीला हात लावू देणार नसल्याचे सांगितले. या मार्गासाठी प्रत्येक शेतकऱ्याच्या हद्दीतील किमान एक ते दीड गुंठे जमीन तुम्ही संपादित करणार आहात याकडेही कॉम्रेड गुरव  यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. आमचा रस्त्याला विरोध नाही मात्र शेतकऱ्याला मारून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीला पाचपट भरपाई ही मिळालीच पाहिजे असे ठणकावून त्यांनी सांगितले. यासाठी न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे. प्रसंगी रक्त सांडले तरी चालेल पण शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्याचे काम करू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. या मार्गामुळे गडहिंग्लज व आजरा शहरात पाचपट वाहतुकीची कोंडी वाढणार आहे याकडे देखील कॉम्रेड गुरव यांनी लक्ष वेधले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दोन्ही शहरातून बायपास रस्ता आवश्यकच आहे. भविष्यात निर्माण होणारी ही वाहतुकीची कोंडी लक्षात घेत सध्याच्या आराखड्यातच बायपास रस्त्याचा समावेश करावा असे त्यांनी सुचित केले.

निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी वाहतूक कोंडी, पार्किंग, पदपथ, उड्डाणपूल, दुभाजक आधी बाबींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत चर्चा घडवून आणली. यावेळी तानाजी देसाई, शिवाजी इंगळे, गणपती येसणे, रवींद्र बेळगुद्री आदींसह इतर शेतकरी व नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित करत सूचना मांडल्या.

रस्ता दुपदरी व दहा मीटर रुंदीचा होणार : कार्यकारी अभियंता मुधाळे

यावेळी माहिती देताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता के.डी.मुधाळे म्हणाले, संकेश्वर- आंबोली महामार्गासाठी गडहिंग्लज व आजऱ्यात भूसंपादन प्रक्रिया चालू आहे. या महामार्गाचा मूळ रस्ता हा 10 मीटर रुंदीचा होणार असून काँक्रीट रस्ता केला जाणार आहे. दोन्ही बाजूला एक - एक मीटर रुंदीचे बाजूपट्टी असणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व भूमि अभिलेख विभाग यांनी मोजणी केलेल्या 2002 च्या रेकॉर्डनुसार सध्या या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र या बैठकीत शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवत पुन्हा नव्याने जमिनीची मोजणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली भावना आक्रमकपणे व्यक्त करत अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले. या मार्गासाठी आजरा एमआयडीसी नजीक टोल नाका प्रस्तावित आहे. मात्र सर्वे केल्यानंतरच याबाबतचा निर्णय होणार असल्याचे कार्यकारी अभियंता श्री. मुदाळे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नेमका महामार्ग कसा होणार आहे याची माहिती सर्वांना दिली.

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे म्हणाले, या महामार्गाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विविध आंदोलनाच्या माध्यमातून याबाबत विचारणा होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने आम्ही माहिती देणे अपेक्षित आहे. भूसंपादन व भरपाई संदर्भात संबंधित विभागाशी चर्चा केली जाईल असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस शिवाजी इंगळे, गणपती येसणे, आनंद येसणे, बजरंग चव्हाण, वसंत जाधव, बाळासाहेब कुंभार, बाळू येसणे, कुमार देसाई, दत्ता सुतार, मंगेश कुंभार आदींसह इतर महामार्ग बाधित शेतकरी तसेच एल.एन मालविया कंपनी भोपालचे मटेरियल इंजिनियर एम.एस.खान व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.