"कारखाना स्वबळावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करणार"
गडहिंग्लज (प्रतिनिधी): छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या एकहाती विजयानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सर्व उमेदवारांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराला बळी न पडता सभासदांनी आमदार हसन मुश्रीफ व माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आघाडीला विजय मिळवून दिला.
डॉ. शहापूरकर म्हणाले, साखर कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकल्याने आता आमची जबाबदारी वाढली आहे. माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून कारखाना स्वबळावर उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे सांगून विजयी झालेल्या सर्व संचालकांना विश्वासात घेत कारखान्याचे व्यवस्थापन अत्यंत पारदर्शी हाताळले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

