Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढल्यास यश निश्चित : जिल्हाधिकारी रेखावार

हरळीच्या सिंबायोसिस स्कूलमध्ये 'कृष्णाई' पुरस्कार समारंभ उत्साहात 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पालकांनी यथाशक्ती द्यावीत. यामुळे मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये जिज्ञासा वाढीस लागेल. या जोरावरच विद्यार्थ्यांना आयुष्यात यश मिळण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

हरळी बुद्रुक (तालुका गडहिंग्लज ) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते.अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध निवेदक व लेखक सुधीर गाडगीळ होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां.ब. मुजुमदार उपस्थित होते.  

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. मुजुमदार यांनी ग्रामीण भागातील हरळी बुद्रुक या छोट्याशा गावात सिंबायोसिस सारखी शिक्षण संस्था सुरू करून मोठे समाजकार्य केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळत आहे. शहरातील शाळांमध्ये नसणाऱ्या सुविधा आज हरळीसारख्या गावात उभ्या असलेल्या सिंबायोसिस स्कूलमध्ये उपलब्ध आहेत असे सांगून या शाळेचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना पालक व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शिक्षक व पालक हेच शैक्षणिक संस्थेचे हृदय असतात. पालक व शिक्षकांनी मुलांना अडचणीत मार्ग शोधण्यासाठी योग्य दिशा दाखवावी. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची पालकांनी जर यथाशक्ती उत्तरे दिल्यास त्यांच्यात प्रश्न विचारण्याची जिज्ञासा निर्माण होईल. प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढीस लागल्यास मुलांना उत्तरे शोधण्यासाठी मेहनत करण्याची सवय लागेल. मुले जेव्हा प्रश्ने विचारण्यास शिकतात तेव्हाच त्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी तयार होते. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत आपली मुले टिकतील का? अशी शंका खेड्यातील पालकांच्या मनात असते, मात्र विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास खेड्यातील विद्यार्थीही स्पर्धेत नक्कीच टिकू शकतील. त्यामुळे पालकांनी मुलांना जिद्द, आत्मविश्वास व प्रश्नांची यथाशक्ती उत्तरे दिल्यास निश्चितच मुलांचे आयुष्य उज्वल होईल असे सांगितले. पालकांनी आपल्या मुलांना खूप शिकवावे व त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक व लेखक सुधीर गाडगीळ  यांना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्ने विचारली. या प्रश्नोत्तरातून लेखक गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.  

प्रास्ताविक मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सिंबायोसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सतीश घाळी यांनी करून दिला. यावेळी भित्तीपत्रक व दालनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब.मुजुमदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी रेखावार व श्री गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक परीक्षेत हे संपादन केल्याबद्दल प्रियांका गुंडू सावंत, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल श्रेया अशोक पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कै. आबासाहेब मुजुमदार होतकरू, गरीब विद्यार्थी पुरस्कार नंदिनी सागर लोहार, आर्या सुनील पाटील, अंकिता दूरदुंडी पाटील, अनुष्का गणेश पाटील, सुजल बाजीराव पोवार तर शालांत पुरस्कार श्रीधर राजेंद्र शेलार, सृष्टी चंद्रकांत कोरे, क्रीडा पुरस्कार सुजल बाळासाहेब चव्हाण, सांस्कृतिक पुरस्कार अमृता काशिनाथ पाटील, विशेष पुरस्कार यश अण्णागोंडा देसाई, आदर्श विद्यार्थी पुरस्कार श्रावणी महादेव आसवले यांना देऊन गौरवण्यात आले.

यावेळी डॉ.शां. ब मुजुमदार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार ॲड.श्रीपतराव शिंदे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, प्रा. किसनराव कुराडे, राजेंद्र गड्यानावर, बाळासाहेब कुपेकर, जयसिंग चव्हाण, रवळनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौगुले, बाळासाहेब सुभेदार, अमर कांबळे, किरण पाटील, पोलीस पाटील तानाजी कुरळे, शिरीष हरळीकर, मंडल अधिकारी रजनी चंदनशिवे, बाजीराव गोरुले,अरुण हरळीकर, बळवंत गुरव, तलाठी साताप्पा लांडगे, माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे, विक्रांत गुरव यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वहिदा मुल्ला व सौ कविता कागिनकर यांनी केले. आभार रावसाहेब मुरगी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.