गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील महात्मा फुले विद्यालयात एटी फौंडेशनच्या वतीने मुलींसाठी लीडरशिप प्रोग्राम संपन्न झाला. यावेळी एटी फौंडेशनच्या प्रमुख व माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अंजू तुरंबेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आय.एस.पाटील होते.
प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाश चौगुले यांनी केले. अंजू तुरंबेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कौशल्य, ज्ञान, कलागुण असतात. आपल्यातील चांगल्या कौशल्याचा शोध घेतला पाहिजे असे सांगितले. एटी फौंडेशन राज्यातील अनेक कुटुंबे व समाज मजबूत बनवण्यासाठी मुलींच्यामधील खिलाडूवृत्ती, नेतृत्व कौशल्य,संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची व निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्याचे कार्य करते. समाजात वावरताना मुलींनी आत्मनिर्भर बनावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तुरंबेकर यांनी मुलींकडून शाळेच्या मैदानात विविध प्रात्यक्षिके करून घेत त्याचा उपयोग जीवनात कसा होतो याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक अशोक नांदुलकर, भक्ती पोवार,अश्विनी तुरंबेकर,भीमराव भुईंबर अनिल हलकर्णीकर, रविंद्र पाटील, महेश पाटील, संदेश कोकितकर, रमेश कळविकट्टे, कुलदिप देसाई, दयानंद सुतार, एकता पाटील, सुवर्णा शेवाळे,रविना निकम, शिवाजी सुतार, चंद्रकांत पाटील, नरसु कांबळे ,शांताराम वाघराळकर उपस्थित होते. किरण पाटील यांनी सुत्रसंचालन केले. सुभाष सुतार यांनी आभार मानले.



