नेसरी खिंडीत बलिदान दिलेल्या वीरांची चित्रपटात काल्पनिक नावे वापरल्याने नेसरीकर संतप्त
चुकीचा इतिहास दाखविल्याबद्दल व्यक्त केला निषेध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या जीवन चरित्रावर आधारित "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याच्या निषेधार्थ नेसरी येथे ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध फेरी काढली. या चित्रपटात काल्पनिक नावे वापरल्याने नेसरीकर संतप्त झाले आहेत.
या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे👇 क्लिक करा
"वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटात सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्यासोबत नेसरी खिंडीत बलिदान दिलेल्या सहा सरदारांची नावे चुकीची वापरली आहेत. चित्रपट दाखवताना ही नावे काल्पनिक वापरण्यात आली आहेत. याचा निषेध म्हणून नेसरी येथील प्रतापराव गुर्जर चौक येथे नेसरीकरांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रारंभी नेसरीतील मसणाई मंदिरानजिक असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर निषेध फेरी गावातून काढण्यात आली.
ही निषेध फेरी नांदवडेकर गल्ली, बाजारपेठ यासह मुख्य चौकात आली . यावेळी विविध मान्यवरांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
या निषेध फेरीत सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, हेमंत कोलेकर, भय्यासाहेब कुपेकर, यशवंत देसाई, सरपंच आशिष साखरे, अॅड. संदीप फगरे, विलास हल्याळी, प्रशांत नाईक, अशोक पांडव, विशाल रेडेकर, अमर हिडदुगी, एस.एन.देसाई, रवी बोरगल्ली, कार्तिक कोलेकर, अमर कोले यांच्यासह नेसरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





