दोन विदेशी प्रवासी ताब्यात, एका महिलेचा समावेश
महसूल गुप्तवार्ता संचालनालयची कारवाई
मुंबई (सौजन्य: पीआयबी) : इथिओपिअन एअरलाईन्सचे विमान ईटी-640 ने प्रवास करून अडीस अबाबा इथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या दोन प्रवाशांना अंमली पदार्थाची वाहतूक केल्याबद्दल ताब्यात घेतले. दोघांकडे कोकेनची 1794 ग्रॅम पूड मिळाली असून त्याची काळ्या बाजारात किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या मुंबई विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रवाशांकडे असलेल्या चार रिकाम्या बॅगा तपासल्या असता प्रत्येक बॅगेतून पांढरी पूड भरलेल्या दोन अशा एकून आठ प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या. तपासणीअंती ही पूड कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. 1985 च्या अंमलीपदार्थ कायद्यानुसार कोकेनवर बंदी आहे. हे दोन्ही प्रवासी विदेशी नागरीक असून त्यांतील 27 वर्षीय पुरुष केनियाचा नागरीक आहे व 30 वर्षीय महिला गिनीची नागरीक आहे. पुरुष प्रवासी विदूषक म्हणून काम करतो व महिला प्रवासी महिलांसाठीच्या कपडे उद्योगात कार्यरत आहे. या दोघांकडे कोकेनची 1794 ग्रॅम पूड मिळाली असून त्याची काळ्या बाजारात किंमत जवळपास 18 कोटी रुपये इतकी आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

