Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सीमाप्रश्नी लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार

सीमाभाग समिती समन्वयक व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची शिनोळी येथील प्रचारसभेत ग्वाही

सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी लवकरच हेल्पलाईन 


चंदगड
: सीमाभागातील बांधवांच्या अडचणी, समस्या समजून घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदैव सीमाभागातील जनतेच्या पाठीशी आहेत असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.‌

शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील बाळासाहेबांची शिवसेना प्रणित शिवशाही युवा आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मारुती बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले, चंदगडची भौगोलिक रचनाही आपल्या पाटण मतदारसंघातप्रमाणेच आहे. त्यामुळे मतदारसंघातील समस्यांची मला जाण आहे. चंदगडचे मागासलेपण पुसण्यासाठी शिंदे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी देऊ, असे आश्वासन देऊन तालुक्यातील बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. तसेच शिंदे-फडवणीस सरकारने नेहमीच सीमाभागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र सरकारकडून ८६५ गावांना योजनांच्या माध्यमातून मिळणारा निधी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात बंद करण्यात आला. पण शिंदे-फडणवीस सरकार येताच त्या पुन्हा सुरू करून सीमाभागातील मराठी भाषिकांना दिलासा दिला आहे. 

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची बैठक घेऊन सीमाप्रश्नी सर्वाच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दोन्ही राज्यांनी सामंजस्यांची भूमिका घ्यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही यापुढील ती काळजी घेऊन मराठी भाषिकांच्या पाठीशी राहू असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषिकांसाठी लवकरच हेल्पलाईन 

सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र सरकारने हेल्पलाईन सुरू करावी, जेणेकरून आमच्या समस्या त्यावर मांडता येईल, अशी विनंती बेळगावमधील एका मराठी भाषिक युवकांनी केली असता लवकरच ती सुरू करू, असे आश्वासन दिले. 

यावेळी माजी सरपंच नितीन पाटील, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेश पाटील, दिवाकर पाटील, कल्लाप्पा निवगिरे, विनोद पाटील, रघुनाथ गुडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.