Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कडलगे, बटकणंगले, कौलगे, कडाल ग्रामपंचायती बिनविरोध


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बुधवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे, बटकणंगले, कौलगे, कडाल या चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच पदासाठी एकूण दाखल १८९ अर्जापैकी ९८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ९१ अर्ज शिल्लक राहिले तर सदस्य पदासाठी एकूण दाखल १०५७ अर्जापैकी ४२२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ६३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली.

गडहिंग्लज तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार आहेत. अर्ज माघारीची प्रक्रिया येथील एम.आर.हायस्कूलमध्ये पार पडली. निवडणूक लागलेल्या गावातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. कोणत्या उमेदवाराला माघार घ्यावयास लावावयाची व कोणाला उमेदवारी द्यावयाची याबाबत दिवसभर  'प्लॅनिंग' सुरू होते. माघार घ्यावयास लावलेल्या उमेदवारांची मनधरणी स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते करताना दिसत होते.

भडगाव, महागाव, कडगाव, नेसरी, कळविकट्टे, बड्याचीवाडी  येथील लढती या लक्षवेधी होणार आहेत. त्यातच सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने आणखी चुरस वाढली आहे.

वैरागवाडीत सदस्य बिनविरोध, मात्र सरपंच पदासाठी लढत 

वैरागवाडी येथे सदस्य पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली, मात्र सरपंच पदासाठी दोन उमेदवारांमध्ये लढत होत आहे. यामुळे याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

लढतीचे चित्र स्पष्ट

एकंदरीत, माघारी नंतर ३० गावातील लढतींचे चित्र स्पष्ट झाले. यामध्ये महागाव, भडगाव, कडगाव, हरळी खुर्द, सांबरे या ग्रामपंचायतींसाठी तिरंगी लढत होत आहे. तर करंबळी, नेसरी, खमलेहट्टी, कुमरी, मुगळी, बेकनाळ या ठिकाणी दुरंगी तर हसुरवाडी येथे चौरंगी लढत होत आहे. त्यातच काही ठिकाणी बंडखोरी व अपक्ष उमेदवारांमुळे नव्या आघाड्याही स्थापन होण्याची शक्यता आहे. निवडणूक होणाऱ्या या गावांमध्ये राजकीय वातावरण तापले असून गावच्या "मिनी मंत्रालयावर" सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांकडूनच रस्सीखेच होणार आहे.    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.