गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन माजी विद्यार्थी व गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक विश्वास देसाई, निवृत्त प्राध्यापिका विजयमाला घोलपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. आनंदा कुंभार यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, शिवराज महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवण्याचे मौलिक कार्य केले आहे. असे पवित्र कार्य करणारी या भागातील मातृसंस्था म्हणून 'शिवराज'ची ओळख आहे. या विद्या संकुलाच्या माध्यमातून माजी विद्यार्थी सतत संस्थेशी जोडलेला असावा यासाठी संस्थेने माजी विद्यार्थ्यांसाठी व्यापक स्वरूपाचे कार्य हाती घेतले आहे. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावे असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून माजी विद्यार्थी शिवराज महाविद्यालयाचा अभिमान आहे. माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक शिवराजीयन जोडला जावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. लवकरच माजी विद्यार्थी संघटनेची कार्यकारणी तयार करीत आहोत. त्यांच्यासाठी लवकरच माजी विद्यार्थी भवन उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी माजी विद्यार्थी विश्वास देसाई, विजयमाला घोलपे, बसवराज आजरी, बी.एस.सावंत, ॲड. सतीश इटी, प्रा.नाजिया बोजगर, अक्षय कित्तुरकर आदींनी शिवराज मधल्या आठवणी उलगडल्या. आपल्या करिअरला 'शिवराज'मुळे कशी भरारी मिळाली याबाबत सांगितले. मिल्टन नोरेंज यांनी लवकरच माजी विद्यार्थी संघटनेशी अधिकाधिक माजी विद्यार्थी सहभागी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी इलियास बारदेस्कर, राजू कुलकर्णी, संभाजी शिवारे, इक्बाल अत्तार, बी.एस.मोहिते, मुरलीधर कांबळे, शैलेश पाटील यांच्यासह बहुसंख्य माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. आभार प्रा. बी.एस.पठाण यांनी मानले.





