सरपंच करवीर उथळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांकडून निवेदने सादर
निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक
![]() |
| मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना सरपंच करवीर उथळे, राजू इंगवले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य मोसिम मुल्ला, रमेश पुजेरी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी गावातील अंतर्गत रस्त्यांचे व पाणंद रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बांधणे व चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, पोलीस पाटील भरती प्रक्रिया करण्यात यावी, गावात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी आदी मागण्यांची निवेदने तेरणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट मंत्रालयात भेट घेऊन दिली आहेत. या शिष्टमंडळात सरपंच करवीर उथळे, ग्रामपंचायत सदस्य मोसिम मुल्ला, रमेश पुजेरी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू इंगवले यांचा समावेश होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेरणीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या व अडचणी ऐकून घेतल्या. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देखील संबंधित विभागाला दिल्या.
![]() |
| मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गावातील विविध समस्या मांडताना सरपंच करवीर उथळे. यावेळी राजू इंगवले, रमेश पुजेरी व मोसिम मुल्ला. |
अंतर्गत रस्ते डांबरीकरणास निधीची मागणी
गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व गटर बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे. तेरणी येथील श्री. महालक्ष्मी देवीची यात्रा तब्बल नऊ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दिनांक २ मे ते ६ मे दरम्यान होत आहे. या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सध्या गावातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत तर काही गल्ल्यांमध्ये गटर्स नसल्याने यात्रा कालावधीत भाविकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागणार आहे. परिणामी खराब अंतर्गत रस्त्यांमुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. अंतर्गत रस्ते व गटर बांधकामासाठी ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे सदर कामांसाठी शासनाच्या कोणत्याही फंडातून निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
![]() |
| मुंबई: तेरणीतील समस्यांसंदर्भात चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दादा भुसे. यावेळी उपस्थित सरपंच करवीर उथळे. |
छत्रपती शिवाजी चौक सुशोभीकरणास निधी द्या
तेरणीतील छत्रपती शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. तेरणी हे गाव महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेवर आहे. जवळच किल्ले सामानगड देखील आहे. ६ हजार लोकवस्तीचे गाव असून सदर गाव हे कोल्हापूर संस्थानातील दक्षिणेकडील महत्त्वाचे स्थान असलेले गाव आहे. येथे छत्रपती शिवाजी चौक या नावाने ओळखला जाणारा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी चौक आहे. या ठिकाणी दरवर्षी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी तसेच अन्य राष्ट्रीय दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे गावातील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थांचे प्रेरणा व श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व सुशोभीकरण कामासाठी अंदाजे ५० लाखपर्यंत खर्च अपेक्षित असल्याने इतका निधी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर कामासाठी शासनाच्या कोणत्याही फंडातून निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
![]() |
| मुंबई : कोल्हापूरचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देताना सरपंच करवीर उथळे व सदस्य रमेश पुजेरी. यावेळी उपस्थित सदस्य मोसिम मुल्ला, राजू इंगवले. |
पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरणास निधीची मागणी
तेरणीतील खानापूर ते दड्डी क्रमांक १२३ हा पाणंद रस्ता रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातून केली आहे. तेरणी गावची सहा हजार इतकी लोकसंख्या असून गावचा विस्तार मोठा आहे. खानापूर ते दड्डी क्रमांक १२३ पाणंद रस्ता हा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून एक किलोमीटर पर्यंत झाला आहे. पुढील रस्ता करण्यासाठी निधी उपलब्ध न झाल्याने काम झालेले नाही. सदर रस्त्याचे अत्यंत गरज आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण झाल्यास नागरिकांना तसेच इतरांनाही वाहतुकीसाठी चांगली सोय होणार आहे. यासाठी निधी मिळण्याची मागणी केली आहे.
![]() |
| मुंबई : मंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना सरपंच करवीर उथळे व राजू इंगवले. यावेळी उपस्थित सदस्य रमेश पुजेरी, मोसिम मुल्ला. |
हंजी शेत ते फडके वसाहत खडीकरण डांबरीकरणासाठी निधीची मागणी
तेरणीतील हंजी शेतापासून ते फडके वसाहत व कुमरी विहीर ते मनवाड रस्ता खडीकरण व डांबरीकरण मंजूर होऊन निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. फडके वसाहतकडे जाणारा रस्ता व कुमरी विहीर ते मनवाड जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदर रस्त्यावरून नागरिकांना तसेच अवजड वाहनांना वाहतूक करणे त्रासदायक ठरत आहे. परिणामी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे खूप गरजेचे आहे. यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे यांची देखील या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत निवेदन सादर केले.





