Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा!

आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


आजरा (प्रतिनिधी): 
आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची मागणी धरणग्रस्त संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ धरणग्रस्त गेली 22 वर्ष पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी लढत आहेत. आधी पुनर्वसन मग धरण हा कायदा असून सुद्धा कायद्याला न जमता 40 टक्के लोकांचे पुनर्वसन बाकी असताना घळभरणीचे काम करून धरणात पाणी साठवले आहे. वास्तविक घळभरणी करण्यापूर्वी पुनर्वसन शंभर टक्के झाल्याचे प्रमाणपत्र कृष्णा खोरे महामंडळाला घ्यावे लागते, मात्र पुनर्वसन पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र न घेताच पाणीसाठा करण्यात आला आहे. याची चौकशी मानवी हक्क आयोगामार्फत करण्यात यावी अशी मागणी देखील या निवेदनातून केली आहे.

शेतकऱ्यांची जमीन धरणासाठी वापरून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण करून त्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करणे हा मोठा अन्याय आहे. काही धरणग्रस्तांना शेतजमीन मिळाली पण मागणीप्रमाणे भूखंड वाटप केले जात नाहीत. अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. काही शेतकऱ्यांचे करार करून घेतले आहेत मात्र संकलन यादीत नाव नसणाऱ्या चाळीस वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बहिणींच्या तक्रारीचे निमित्त करून त्यांचे पॅकेज दिले जात नाही. धरणग्रस्तांना कोणी वाली नाही असे समजून काही अधिकारी काम करत आहेत, याकडेही या निवेदनातून लक्ष वेधले आले आहे. पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे लक्ष घालून धरणग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या निवेदनातून शिवाजी गुरव यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.