Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- बांदा महामार्गासाठी जमिनीचे रीतसर भूसंपादन करा!

महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांना निवेदन 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
आंबोली- आजरा-गडहिंग्लज- संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग 548 या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुती करण्यास लागणाऱ्या जमिनीचे रीतसर भूसंपादन करण्याची मागणी संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ई-मेल द्वारे पाठविण्यात आले आहे. दरम्यान, आजरा तहसीलदारांना सदर निवेदन महामार्ग बाधित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून दिले आहे.  

या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या कार्यालयामार्फत दिनांक 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीच्या संदर्भातील प्रत्येक गाव चावडीवर बाधित गटाची यादी लावली जात आहे. यातील संकेश्वर- बांदा महामार्गामुळे बाधित होणारे गट नंबर हे फक्त वळण काढून रस्ता सरळ करताना लागणारी जमीन संपादन करण्यासाठीचे आहेत. परंतु सरसकट जिथून रस्ता पूर्वीपासून गेलेला आहे व तो  कधीही संपादन झालेला नाही अगर कोणत्याही प्रकारचा मोबदला शेतकऱ्यांना दिलेला नाही त्यामुळे सरसकट सर्व बाधित शेतकऱ्यांची जमीन मोजून संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

बैठकीमध्ये वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या 1995 च्या निर्णयाची शेतकऱ्यांना भीती घातली जात आहे. कारण सध्या दोन पदरी रस्ता होणार असल्याचे आपल्याकडून सांगितले जात आहे. तो रस्ता दहा मीटरने काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला गटर असे बारा मीटर त्यानंतर झाडे लावून तीन मीटर जमीन वापरली जाणार आहे. म्हणजे एकूण पंधरा मीटरने काम करणार आहात. म्हणजेच किमान 45 फूट रुंदीने काम होणार आहे. 45 फुटावर वीस वर्षे वहिवाट नसून ती काही ठिकाणी 3.75 मीटर तर काही ठिकाणी 5.50 मीटर आहे. असे सार्वजनिक बांधकाम कार्यालयातून अठरा वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात माहिती घेतली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याकडेच्या  जमिनीचा गट नंबरची मोजणी करून शेतकऱ्याची किती जमीन बाधित होते याचा सर्वे करावा व निवाडा तयार करून 2013 च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे रेडी रेकनरच्या पाचपट महामार्गाचा दर धरून भरपाई देण्यात यावी अगर बाजार भावच्या दहापट रक्कम द्यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. 

शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा. काही गोरगरीब मजूर पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ रस्त्याच्या कडेला घरे बांधून राहत आहेत त्यांच्या घरांचा  सर्वे करून त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकरी व घरांचे पुनर्वसन झाल्यास महामार्ग होण्यास आमचा विरोध नाही असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव, जयवंत थोरवतकर, शिवाजी इंगळे, आनंद येसणे, गणपती येसणे, रवींद्र जाधव, चंद्रकांत जाधव आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.