Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रस्त्यावरील अंधश्रद्धेचे 'गाठोडे' पेटवत "अंनिस"ने केले प्रबोधन


गडहिंग्लज
(प्रतिनिधी): अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन  आपल्या अडचणी, समस्यांवर मात करण्यासाठी एखाद्या  मांत्रिकाकडून उतारा करून घेऊन रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या लिंबू, गुलाल, तांदूळ, नारळासह विविध वस्तूंचे गाठोडे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा.पी.डी. पाटील यांनी एकत्रित करत रस्त्याच्या कडेला पेटवून दिले. भूत-पिशाच्च, जादूटोणा वगैरे या गोष्टी खोट्या आहेत हे या माध्यमातून दाखवत प्रा.पाटील यांनी समाजाचे प्रबोधन केले.

सध्या मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साह्याने प्रगती केली आहे. मात्र आजही काही व्यक्ती अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसतात. ही बाब दुर्दैवी आहे. आपल्याला झालेला एखादा आजार घालवण्यासाठी मांत्रिकानी सांगितलेल्या वस्तू गावातील तिट्टयावर हमखास ठेवल्या जात असल्याचे पहावयास मिळते. असाच प्रकार महागावातील प्रवेशद्वाराजवळ घडला. पेट्रोल पंपालगत महागाव, चंदगड व गडहिंग्लजकडे जाणारा येथे तिट्टा आहे. या तिट्टयावर अमावस्या, पौर्णिमा ,रविवार, बुधवार, शुक्रवार अशा दिवशी मांत्रिकाने सांगितलेल्या वेगवेगळ्या वस्तू मध्यरात्री ठेवल्या जातात. या मार्गावरून महागावात शाळा, कॉलेजची मुले जा-ये करत असतात. अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्याने मुले घाबरून त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या शंका निर्माण होतात. शिवाय अशा वस्तू रस्त्यावरच पडून राहिल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. पी. डी. पाटील शाळा संपवून गडहिंग्लजला जाताना लाल रंगाच्या कापडाने बांधलेली  टोपली दिसली. त्यांनी ती टोपली रस्त्याच्या कडेला पेटवण्यासाठी ठेवली. त्या टोपलीत वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, दोऱ्याने गुंफलेले  नारळ, खोबरे,अंडी, कोंबडीचे पिल्लू, केळी, पानसुपारी, लिंबू, टाचण्या, मोळे अशा वस्तू टोपलीत होत्या. रस्त्यावर रहदारी असल्याने अनेक वाहनधारक ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी थांबले. काही तरुणही जमा झाले. प्रा. पाटील यांनी सदर साहित्याची टोपली तरुणांच्या मदतीने पेटवून दिले. अशा वस्तू ह्या केवळ अंधश्रद्धेपोटी ठेवल्या जातात हे प्रा.पाटील यांनी कृतीतून दाखवून दिल्याने त्यांच्या धाडसाचे उपस्थित लोकांनी कौतुक केले.

लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे: प्रा.पी.डी.पाटील 

करणी, भूत, पिशाच्च,जादूटोणा या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीकडे पाहिले पाहिजे.परंतु आजही ग्रामीण व शहरी भागात प्रामुख्याने अमावस्या- पौर्णिमेला  विशेषतः निवडणुकीच्यावेळी तिट्टीवर करणी ,जादूटोणा करण्यासाठी वस्तू ठेवतात.या गोष्टी होऊ नये. यासाठी लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. पी.डी. पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.