मुंबई (प्रतिनिधी): 'नाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची', 'पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा', 'खेळताना रंग बाई होळीचा', 'सोळावं वरीस धोक्याचं', 'फड सांभाळ तुऱ्याला ग आला', 'पाडाला पिकला आंबा' अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्यांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज (१० डिसेंबर) रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून सुलोचना यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचे दिसले होते . यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
सुलोचना कदम असे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले. त्यांनी लहानपणी मेळ्यांपासून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या उर्दू नाटकांमध्ये मजनूचीही भूमिका करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते. त्यावेळी के. सुलोचना म्हणूनही त्या पार्श्वगायन क्षेत्रात होत्या.
त्यांनी आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. हा मराठीतील त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांनी शाम चव्हाण यांच्या कलगीतुरा या चित्रपटासाठी लावणी गायन केले. चव्हाण यांनीच सुलोचना कदम यांना लावणी गायन शिकवले. शब्दफेक, स्वरातील चढ उतार याची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर सन १९५३ मध्ये सुलोचना कदम यांचा शाम चव्हाण यांच्याशी विवाह झाला आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या.
सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमुना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
लावणीचा अभिजात सुर हरपला: सुधीर मुनगंटीवार
लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचनाताई चव्हाण यांच्या निधनाने लावणीचा अभिजात सुर हरपल्याची शोक भावना सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीची लावणी किती समृध्द असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालुन दिला आहे. अनेक तमाशा प्रधान चित्रपटातुन त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातुन ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाताईं इतके कोणीही उत्तम करू शकलेले नाही. पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखडयाची सुरूवात ठसकेबाजच झाली पाहीजे, असे सुलोचनाताईंचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच. सुलोचनाताई लावणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शास्त्रीय गायकीचे कोणतेही विधीवत शिक्षण न घेता दीर्घकाळ त्यांनी लावणीच्या माध्यमातुन रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटविलेला ठसा कधिही विसरू शकणार नाही. त्यांनी गायलेल्या लावण्यांनी जनमानसांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविले आहे. लावणीला राजमान्यता, लोकमान्यता व प्रतिष्ठा मिळवून देणा-या सुलोचनाताईंच्या निधनाने या क्षेत्राची कधिही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

