Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

खेळाडूंनी आपली शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे गरजेचे : चौगले


 शिवराज महाविद्यालयात एक दिवशीय कार्यशाळा संपन्न

गडहिंग्लज (प्रतिनिधी): आपण आजच्या धावपळीच्या जीवनात आपली शारीरिक तंदुरुस्ती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नेहमी सात्विक आहार घेण्याबरोबरच रोजचा आवश्यक व्यायाम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शांती निकेतन ज्युनिअर कॉलेज कोल्हापूरचे शारीरिक शिक्षण शिक्षक सचिन चौगले यांनी केले.

गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठ आणि शिवराज प्रमुख अग्रणी महाविद्यालय आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. या कार्यशाळेचे उदघाटन प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रा.अशोक मोरमारे यांनी केले. क्रीडा विभाग प्रमुख डॉ. राहुल मगदूम यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी बोलताना सचिन चौगले पुढे म्हणाले, आपण आपल्यासाठी रोज एक तास व्यायाम करणे जरुरीचे आहे. आपले आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे. आपण उत्तम आरोग्याशिवाय आनंदी जीवन जगू शकत नाही. उत्तम आरोग्य हा व्यक्तिमत्त्वाचा मुख्य पाय आहे.खेळाडूंनीच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली शारीरिक तंदुरुस्ती जपून आपले करिअर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

निसर्गाने आपल्याला उत्तम असा देह दिला आहे, त्याला सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्या आधारे आपल्यातील विविध कौशल्ये विकसित करून आपल्या करिअरला आकार देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तम व सकस आहार घेणे आवश्यक आहे. त्यातून आपल्यामध्ये क्षमता विकसित करून ताकद, वेग, लवचिकता टिकविता येईल. त्यामुळे आपल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविता येईल व शरीराची झीज भरून काढता येईल. आपल्या शरीरासाठी जीवनसत्वे, कार्बोदके, प्रथिने खनिजे यांचा  उपयोग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात आजरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय पाटील यांनी उत्तम आरोग्यासाठी कोणकोणते व्यायाम आपण दररोज केले पाहिजेत व आहाराचे नियोजन कसे केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये गडहिंग्लज विभागातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. प्रा.एन.बी. ईकीले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.