Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे 9 जानेवारीपासून गडहिंग्लजला बेमुदत ठिय्या आंदोलन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर - बांदा महामार्ग बाधित शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक 9 जानेवारी पासून गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती महामार्ग बाधित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी दिली. या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संकेश्वर - बांदा महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. या महामार्गाच्या कामासाठी लगतच्या शेतजमिनी वापरल्या जात असल्याने हजारो शेतकरी बाधित होत आहेत. शेतजमिनी सोबतच छोटे-मोठे व्यवसायिक, त्यांच्या टपऱ्या, दुकाने, निवासी घरे देखील बाधित होणार आहेत.

महामार्ग लगतच्या या सर्व शेतकरी व इतर बाधित होणाऱ्या लोकांच्यामध्ये याविषयी प्रचंड गोंधळ व अस्थिरता निर्माण झाली आहे. रस्ता करणाऱ्या यंत्रणेने आम्ही फक्त आमच्या हद्दीत म्हणजे आमची वहिवाट आहे त्या हद्दीत रस्त्याचे काम करीत आहोत त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी लागत नाही अशी भूमिका घेतली आहे. ही भूमिका कायद्याला व न्यायाला धरून नाही. न्यायालयीन निर्णयानुसार सरकारची वहिवाट फक्त साडेपाच मीटर डांबरी रस्ता इतकी अंतरासाठीच आहे; त्याच्या बाहेर आता जो नव्याने रस्ता रुंदीकरण केले जाणार आहे त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची मालकी असलेली जमीन वापरली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

रस्ता तयार करणाऱ्या यंत्रणेने आपली भूमिका स्पष्ट करून संबंधित रस्ता लगतच्या सर्व शेतकऱ्यांना व इतर छोटे टपरीवाले, दुकान मालक, निवासी लोक यांना याबाबत लेखी नोटीस दिली पाहिजे, 5:30 मीटरच्या बाहेरची वापरली जाणारी जमिनीची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना दिली पाहिजे व त्यासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांना तशा लेखी नोटीसा काढल्या पाहिजेत. याबाबत योग्य संवाद हितसंबंधित शेतकऱ्यांशी रस्ता करणाऱ्या शासकीय यंत्रणेने केला पाहिजे व त्यासाठी वरिष्ठ पातळीवर संबंधित अधिकारी व बाधित शेतकरी व त्यांचे प्रतिनिधी यांची व्यापक बैठक जिल्हा पातळीवर घेऊन यातून मार्ग काढण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी 9 जानेवारीपासून गडहिंग्लज उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.