Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य हे सर्वजनवादी: डॉ. लवटे

गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयात केले मार्गदर्शन

कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्काराने डॉ.ए.एम.हसुरे तर कर्मवीर गुणवंत कर्मचारी पुरस्काराने नवनाथ दळवी यांचा गौरव

प्रा. प्रकाश कांबळे लिखित "परिवर्तन' पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन 

                                   (छायाचित्र : मज्जीद किल्लेदार) 

गडहिग्लज (प्रतिनिधी) :
भारतात अस्पृश्यता निवारणाचे कार्य प्रथम महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले. प्रार्थना समाजाच्या निमित्ताने महर्षी शिंदे जेव्हा खेड्याकडे जात होते तेव्हा तेथील अस्पृश्यता पाहून महर्षी शिंदे यांचे डोळे पाणावले. त्यामुळे परिवर्तनाचे खरे कार्य खेड्यामध्ये केले पाहिजे हे त्यांनी ओळखले.अस्पृश्यता निवारणासाठी "डीस्प्रेस्ड क्लास मिशनची' स्थापना केली. पुढे अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी त्रावणकोर, ओरिसा, दिल्लीसह सर्वदूर पोहोचवले. त्यांचा विचार व्यापक होता. देशाच्या जडणघडणीमध्ये महर्षी शिंदेंनी मुलभूत स्वरूपाचे योगदान दिले आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे कोणत्याही विशिष्ठ पक्षाचे, जातीचे व धर्माचे उपासक नव्हते म्हणून त्यांचे कार्य सर्वजनवादी होते. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी गडहिंग्लज येथे केले.

येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे सर्वजनवादी कार्य' या विषयावर मार्गदर्शन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुनीलकुमार लवटे पुढे म्हणाले, अखिल भारतीय पहिली अस्पृश्यता निवारण परिषद महर्षी  शिंदे यांनी भरविली.अस्पृश्यता निवारणाचे महान कार्य त्यांनी केले. महर्षी शिंदेनी पुण्यात अहिल्याश्रम सुरू केला. महर्षी  शिंदे यांनी ज्यावेळी अस्पृश्यांसाठी कार्य केले तेव्हा मराठ्यांनी त्यांना आपले मानले नाही. त्यानंतर मराठ्यांसाठी त्यांनी कार्य केले, त्यावेळी अस्पृश्यांनी त्यांना आपले मानले नाही त्यामुळे समाजात खऱ्याअर्थी ते उपेक्षित राहिले. या समाजाचे नेतृत्व बहुजन वर्गाचे असावे यासाठी ते आग्रही होते. धर्माकडे नव्या दृष्टीकोनातून पहिले पाहिजे, सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे अशी विचारधारणा महर्षींची होती.

डॉ.लवटे पुढे म्हणाले, मानवता हाच श्रेष्ठ धर्म हा जगाचा विचार झाला पाहिजे. सदाचार, सत्य, समानता हे मानवता धर्मात आहे. खरा धर्म बहुजनांना समजावून सांगितला पाहिजे. या देशात जोपर्यंत इतिहासाचे जाणतेपणाने वाचन होत नाही तोपर्यंत महर्षी शिंदे हे खऱ्याअर्थी कळणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. खरेतर थोर पुरुषांच्या चरित्राचा व कार्याचा विचार मानवी दृष्टीकोनातून करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रा. किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा आदर्श ठेवून आमची संस्था वाटचाल करीत आहे. नव्या पिढीला थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे समजले पाहिजेत यासाठी त्यांच्या विचारांचा जागर संस्थेच्या वतीने करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रा. प्रकाश कांबळे लिखित "परिवर्तन' या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ. आप्पासाहेब हसुरे यांनी आपल्या मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमात प्रारंभी दीपप्रज्वलन, पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत प्रा. विश्वजित कुराडे यांनी केले. सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी संस्था सचिवांची भूमिका मांडली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. प्रा.एन.बी. एकीले यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मानपत्राचे वाचन पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, बियामा वाटंगी यांनी केले.

यावेळी दरवर्षी देण्यात येणारे कर्मवीर गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉ.ए.एम.हसुरे तर कर्मवीर गुणवंत कर्मचारी पुरस्कार नवनाथ दळवी यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी या भागातील अंधश्रद्धा व जटानिर्मूलनाचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ.एस.के नेर्ले, प्रा.पी.डी.पाटील, पांडुरंग करंबळकर, प्रा.सुभाष कोरे, सुर्यकांत देसाई, अशोकराव मोहिते, प्रशांत नाईक, रवळू पाटील, भूषण सुरंगे व अन्य कार्यकर्ते यांच्यासह उपविभागातील जटामुक्त भगिनी गौराबाई मोळदी, गीता सुतार, रेशमा कांबळे, सोनाबाई लोहार, सुशीला कांबळे, लक्ष्मीबाई माडभगत, गंगुबाई बनगे, शांताबाई भोसले व इतरांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, माजी नगराध्यक्षा निरुपमा बन्ने, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.जे.वाय.बारदेस्कर, ॲड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास विविध मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक मोरमारे, डॉ.श्रद्धा पाटील, प्रा.आशा पाटील यांनी केले. तर आभार डॉ.आनंदा कुंभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.