महागावच्या राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मराठी भाषेला फार मोठी परंपरा आहे. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून येथे राहत असलेल्या लोकांची मातृभाषा आहे. वाढत्या स्पर्धेत मराठी टिकवण्यासाठी इंटरनेट आणि विकिपीडियावर मराठी भाषेचा वापर वाढणे गरजेचे आहे. मराठी भाषा जास्तीत जास्त समृद्ध होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून यासाठी मराठी भाषा शिकणाऱ्या तरुणांकडून जास्तीत जास्त संशोधन झाले पाहिजे असे प्रतिपादन 'तरुण भारत'चे पत्रकार प्रकाश चौगुले यांनी केले.
महागाव येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रचना मुसाई होत्या. प्रास्ताविक डॉ. सुकुमार आवळे यांनी केले.
श्री. चौगुले पुढे म्हणाले, तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सोशल मीडियावर मराठीतून संवाद साधावा. जास्तीत जास्त मराठी साहित्य वाचावे व मराठी नाटक, मराठी चित्रपट पाहण्याला प्राधान्य द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मराठी विभागाच्या वतीने आयोजित भित्तीपत्रिकेचे उदघाटन नेसरी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोहर कोळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रा.डी.जी. कापुरे, प्रा. दिलीप काळे, प्रा.वनिता विरकर यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वैजनाथ सूर्यवंशी यांनी तर आभार मराठी विभाग प्रमुख एन.आर.पाटील यांनी मानले.
व्याख्यानास प्राचार्य डॉ. निवास जाधव यांचे मार्गदर्शन तर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर यांची प्रेरणा, संस्था सचिव बी. ए.पाटील यांचे सहकार्य लाभले.


