मुंबई येथे रस्ते अपघातात ओमकार लांडे यांचा दुर्दैवी मृत्यू
लांडे कुटुंबीयांवर शोककळा
समस्त तेरणीकर हळहळले
तेरणी येथील मुळगावी काल अंत्यसंस्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुंबई येथे झालेल्या रस्ते अपघातात मूळचे तेरणी येथील ओमकार चंद्रकांत लांडे (वय वर्ष 23) या युवा छायाचित्रकार व व्यंगचित्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने समस्त तेरणीकर हळहळले. काल सकाळी तेरणी येथील मूळ गावी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या रस्ते अपघातात एक उत्कृष्ट छायाचित्रकार व व्यंगचित्रकार गमावल्याची भावना तेरणीकरांनी यावेळी व्यक्त केली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मूळचे तेरणी येथील चंद्रकांत लांडे व त्यांचे बंधू सुरेश लांडे हे नोकरीच्या निमित्ताने गेली बरीच वर्षे मुंबई येथे स्थायिक आहेत. मुंबईतील चारकोप, कांदिवली परिसरात लांडे कुटुंबीय राहतात. चंद्रकांत लांडे पोलीस दलात तर त्यांचे बंधू सुरेश लांडे हे नौदलात कार्यरत आहेत. ओमकार लांडे हा चंद्रकांत लांडे यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच त्याला चित्र व फोटोग्राफीची आवड होती. त्यामुळे ओमकारने फोटोग्राफीमध्ये करियर करण्याचे ठरवून यशही मिळवण्यास सुरू केले होते. फोटोग्राफीमध्ये ओमकारचा चांगला हातखंडा होता. त्यामुळे चारकोप, कांदिवली परिसरात त्याची एक वेगळी ओळख होती. फोटोग्राफी पाठोपाठच त्याला व्यंगचित्रेही रेखाटण्याचा देखील छंद होता. त्याचबरोबर तो टॅटूही रेखाटायचा. विविध लग्न समारंभांमध्ये ओमकार हा उत्कृष्ट व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करायचा. त्यामुळे लग्न समारंभांसह विविध कार्यक्रमांमध्ये त्यालाच आमंत्रण असायचे.
काळाने हिरावून घेतले...
रविवार दिनांक १५ रोजी ओमकार हा पालघर येथील एका कार्यक्रमासाठी फोटोग्राफी, शूटिंगचे काम करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत गेला होता. यावेळी त्यांच्या वाहनाला अचानक अपघात झाल्याने ओमकार याचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर ओमकार याला वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली होती. या घटनेची माहिती लांडे कुटुंबियांसह तेरणी गावी धडकताच शोककळा पसरली. समस्त तेरणीकर ओमकार याच्या अकाली निधनाने हळहळले. सोमवारी सकाळी मुंबईहून ओमकार याचा मृतदेह तेरणी येथे आणण्यात आला. काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओमकार याच्या पाठीमागे आई- वडील व एक विवाहित बहिण आहे.

