मा. सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव माने यांचे आवाहन
मतदारांनी पारदर्शक कारभारासाठी महाकाली पॅनलच्या प्रतिनिधीना विजय करावे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढी अपारदर्शक कारभारापासून वाचवून सभासदांच्या दृष्टीने पारदर्शक कारभार करून सभासद हित जोपासण्यासाठी श्री. महाकाली परिवर्तन सहकार पॅनलला सभासद मतदारांनी संधी द्यावी असे आवाहन मा. सहाय्यक पोलीस आयुक्त व महागाव तरुण सेवा मंडळ, मुबईचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी मतदारांना केले आहे.
यावेळी बोलताना श्री माने म्हणाले, गडहिंग्लज तालुका सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. ही निवडणूक सभासदांच्या जोरावरच संस्थेचे भवतव्य ठरवणार आहे. त्यामुळे सभासद मतदारांनी दक्ष व सतर्क राहून संस्थेच्या हितासाठी योग्य व्यक्तींना मत देण्याची गरज निर्माण झाली आहे.
विद्यमान पदाधिकारी व व्यवस्थापनाकडून सुरू असलेला कारभार नक्कीच योग्य रीतीने सुरू नाही हे सर्वश्रुत आहे. व्यापारी व धनदांडग्याचे हित पाहिले जात असून संस्थेच्या सर्वसामान्य सभासदांना योग्य न्याय दिला जात नाही. तर कर्मचारी वर्गाला वेठीस धरले जात आहे. संस्थेचा कारभार मनमानी व नियम धाब्यावर बसून केवळ मनमानीप्रमाणे सुरू आहे. वहान कर्जाने तर परिसीमा गाठलेली आहे. गेल्या पाच वर्षात संस्थेची कर्ज वसुली नगण्य आहे. कर्ज थकबाकीचे प्रमाण वाढत चालले असून ते ३९ टक्केच्या वरती पोहोचले आहे. भविष्यात असाच कारभार सुरू राहिल्यास नक्कीच संस्था अडचणीत येऊन सर्वसामान्य सभासदांचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. त्यासाठी या निवडणुकीत सर्व सभासदानी वेळीच सावध होऊन व विचारपूर्वक मतदान करून बदल घडवून आणणे काळाची गरज आहे.
आपले उमेदवार सर्वांपर्यंत पोहोचतीलच असे नाही तरी पण सर्व सभासदांनी आपल्या परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्र मंडळीना संस्थेच्या सद्य स्थितीची तसेच संस्थेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराची व निवडणूक विषयी माहिती द्यावी आणि निवडणुकीत श्री.महाकाली परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करून संस्था वाचण्यासाठी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवावे असे आवाहन शिवाजीराव माने यांनी केले आहे.




