Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रा.कुराडे यांच्या दोन संशोधन ग्रंथांना करवीर साहित्य सभेचे पुरस्कार प्राप्त


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा.किसनराव कुराडे यांनी लिहिलेल्या "सत्यशोधक महात्मा बसवेश्वर" व स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते तर..." या दोन संशोधन ग्रंथांना करवीर साहित्य सभेच्यावतीने पुरस्कार प्राप्त देऊन नुकतेच गौरविण्यात आले. एकाच साहित्यिकाला एकाचवेळी दोन पुरस्कार प्राप्त होण्याचा हा प्रसंग दुर्मीळच मानावे लागेल.

संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या पारितोषिक वितरण समारंभात रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक उद्योगपती एम.बी.शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

या समारंभामध्ये डॉ.अरुण शिंदे व डॉ.अरुण पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. आपले धर्मग्रंथ, धर्मसंस्थापक आणि भूतकाळातील ऐतिहासिक कर्तबगार व्यक्ती यांच्या जीवन कार्याकडे अंधश्रध्देच्या आहारी न जाता वास्तवतेच्या दृष्टीकोनातून लिखाण झाले पाहिजे अशी अपेक्षा सर्व वक्त्यांनी व्यक्त केली. त्यादृष्टीने प्रा.कुराडे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतिकारक कार्याचा आपल्या संशोधित ग्रंथामध्ये शोध आणि वेध घेतलेला आहे. त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज म्हणून इतिहासात नोंद झालेले पूर्वाश्रमीचे यशवंतराव घाटगे हे कसे स्वयंभू महापुरुष होते आणि संस्थानिक झाल्यामुळे त्यांच्या कार्य आणि क्षेत्रावर मर्यादा पडल्या नसत्या तर त्यांनी त्या पिढीतील राष्ट्रीय नेतृत्व म्हणून कसा इतिहास घडविला असता याचे वास्तव चित्रण केलेले आहे. त्यामुळेच एकावेळी त्यांच्या दोन्हीही ग्रंथांचा करवीर साहित्य परिषदेने यथोचित गौरव केलेला आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गाडगेबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक रा.तू भगत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य दिनकरराव पाटील यांनी करून दिला.

या कार्यक्रमाला वाचन कट्टाचे संस्थापक युवराज कदम, करवीर साहित्य सभेचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शामराव कुरळे, प्राचार्य माळी, डॉ.सरोज बिडकर, यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत लेखक व पारितोषिक विजेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. करवीर साहित्य सभेचे कोषाध्यक्ष एम.डी.देसाई  यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.