आजरा: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रा.पं. पदाधिकारी यांची कार्यशाळा आजरा येथे पार पडली. शासनाच्या शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टे व 9 संकल्पना यावर आधारित कार्यशाळा घेण्यात आली.
सुरुवातीला प्राचार्य पाटील व गटविकास अधिकारी सय्यद यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी कर्मचारी, आशा, ग्रा.प.सदस्य, ग्रा.पं कडील डाटा ऑपरेटर यांनी या कार्यशाळेत भाग घेतला. ही कार्यशाळा पंचायत समितीचे दोन हॉल व तहसील कार्यालयातील एक हॉल असे एकाच वेळी तीन ठिकाणी किमान 24 गावांच्या प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात आले. तीन बॅचमध्ये तालुक्यातील 70 हुन अधिक गावातील प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात आले. गट विकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी कार्यशाळेचे नेटके नियोजन केले होते. विस्तार अधिकारी व इतर अधिकारी यांनी आपापली जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळा घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमार्फत ट्रेनिंग घेतलेले प्रवीण प्रशिक्षक यांनी कार्यशाळा घेतली. यामध्ये तायाप्पा कांबळे,काशिनाथ मोरे, शिवाजी गुरव, प्रकाश बुरुड, मुरलीधर कुंभार, वैष्णवी गुरव, अर्जुन आदित्य, अक्षय आदित्य यांनी पुढील नऊ संकल्पनावर सखोल माहिती दिली. यामध्ये गरीबीमुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव , स्वच्छ आणि हरित गाव, पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण गाव , सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आजरा तालुक्यात शाश्वत विकास या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. प्रवीण प्रशिक्षकांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे नवसंजीवनी मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थी यांनी व्यक्त केली.



