![]() |
| गडहिंग्लज : श्री काळभैरव यात्रेनिमित्त गोंडेे तयार करताना अत्तार कुटुंबीय (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजचे ग्रामदैवत व सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची यात्रा मंगळवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील अत्तार कुटुंबीय भाविकांनी सांगितलेले तब्बल १२ फुटी गोंडे तयार केले असून हे दोन गोंडे आकर्षण ठरणार आहेत.
![]() |
| गडहिंग्लज : श्री काळभैरव यात्रेनिमित्त गोंडे तयार करताना खुतबुद्दीन अत्तार. (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागासह सिंधुदुर्ग, गोवा येथील लाखो भाविक श्री काळभैरव यात्रेसाठी गडहिंग्लजला येतात. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी गडहिंग्लज शहरातील श्री काळभैरव मंदिरातून मिरवणुकीने पालखी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या डोंगरावरील मंदिराकडे रवाना होते. या पालखी मिरवणुकीत मानाच्या सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे. हे गोंडे तयार करण्याचे काम गडहिंग्लजमधील बुरुड गल्लीतील खुतबुद्दीन अत्तार कुटुंबीय दरवर्षी करतात. दिवाळी झाल्यानंतर गोंडे तयार करण्याचे काम अत्तार कुटुंबीय हाती घेतात. जवळपास यात्रेपूर्वी तीन महिने अगोदरपासूनच हे काम सुरू होते.या गोंड्यांची किंमत वीस रुपयांपासून सहा हजार रुपयांपर्यंत असते. यंदाही अत्तार कुटुंबीय गोंडे तयार करत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. यंदा खंडोबा युवा मंच, स्वप्नील चौगुले यांचे बारा फुटी गोंडे, पालखीचे मानकरी उपराटे परिवार व राजे शिवछत्रपती ग्रुप यांचे ८ फुटी गोंडे, शाहू ग्रुप कुंभार गल्ली, रासाई ग्रुप लाखेनगर यांचे ६ फुटी गोंडे असणार आहेत. के.जी अत्तार ग्रुप यांचाही मोठा गोंडा असणार आहे. यंदा हे मोठे गोंडे आकर्षण ठरणार आहेत.
![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गोंडे तयार करण्याच्या व्यवसायात अत्तार कुटुंबीयांची चौथी पिढी कार्यरत आहे. अत्तार कुटुंबियातील खुतबुद्दीन अत्तार, तौफिक अत्तार, नियाज अत्तार, सद्दाम अत्तार, सर्फराज अत्तार, अशिफ अत्तार हे सर्वजण गोंडे मोठ्या भक्तीभावाने तयार करतात. गोंडे तयार करण्याचे काम सुरू झाले की गडहिंग्लजवासियाना श्री काळभैरी यात्रेची चाहूल लागते.
भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच आम्हाला समाधान : खुतबुद्दीन अत्तार
"दरवर्षी श्री काळभैरव यात्रेसाठी मोठ्या श्रद्धेने आम्ही भाविकांचे गोंडे तयार करून देतो. यात्रेपूर्वी तीन महिने अगोदर हे काम आम्ही हाती घेतो. भाविकांच्या मागणीप्रमाणे लहान मोठे गोंडे तयार करून देतो. आम्ही तयार केलेले गोंडे पालखीला बांधून भाविक मनोभावे आपला नवस फेडतात यातच मला व माझ्या कुटुंबाला लाख मोलाचे समाधान आहे". असे खुतबुद्दीन अत्तार यांनी सांगितले.




