Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कणेरी मठ येथील पंचमहाभूत लोकोत्सवास तीस लाख लोक येणार


कणेरी मठ (कोल्हापूर):
आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचतत्वांचे महत्त्व निसर्ग आणि मानवी जीवनात फार आहे. या तत्त्वांचे संवर्धन करणे अर्थात पर्यावरण जपणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने माती, पीक व आरोग्य सदृढ राहण्यासाठी लोकजागृती व्हावी या हेतूने कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या वतीने सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. मठाच्या ६५० एकर जागेवर २० ते २६ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवात भारतातील आणि अन्य दशातील जवळपास ३० लाख लोक सहभागी होतील. इतक्या मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. याच बरोबर अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये व हा कार्यक्रम प्रभावी व्हावा यासाठी यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी रोज सकाळी ८ ते १० या वेळेत स्वामीजींच्या उपस्थितीत बैठका होत आहेत. 

पिकाऊ जमीन आणि जंगल क्षेत्र कमी करून उर्वरित लागवडीखाली जमिनीत रासायनिक खतांचा आणि रासायनिक कीटकनाशकांचा वारेमाप वापर करून पिके कमी वेळेत पोसवली जात आहेत. याचा प्रतिकूल परिणाम जमिनी बरोबरच मानवी आरोग्यावरही होत आहे. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून सिद्धगिरी मठ जवळपास 36 वर्षापासून निसर्ग संवर्धनाचे आणि निसर्गपूरक शेतीच्या माध्यमातून कार्यरत आहे.

रासायनिक शेतीमुळे मानवी आणि जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत आहे. या अनुषंगानेच सिद्धगिरी मठ सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर प्रारंभ पासून भर देत आहे. याचे महत्त्व देशातील व जगातील नागरिकांना कळावे म्हणून सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. या लोकोत्सवास जगभरातील तीस लाख लोक भेट देतील असा अंदाज आहे. याच्या पूर्वतयारीसाठी ५५ उपसमित्या कार्यरत झाल्या आहेत. कणेरीसह आसपासच्या गावात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, अन्नपुरवठा, स्वच्छता या पायाभूत सुविधांची कामे सुरू झाली आहेत.

पंचतत्वाचे पाच कुंभ आकार घेत आहेत. शिल्पकार विविध प्रकारची शिल्प घडविण्यात गर्क आहेत. शेती विभाग व कृषी विज्ञान विभाग जमिनीचा मगदूर कमी न होता विविध पिके कशी घेता येतात हे प्रत्यक्षात लोकांना दाखवण्यासाठी, पिकांच्या वाढीसाठी बारकाईने काळजी घेत आहेत. शेती पूरक व्यवसायही प्रदर्शन आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. या कार्यक्रमाला  येणाऱ्या प्रत्येकाची भूक भागविण्यासाठी  खाद्य पदार्थ बनविण्यासाठी वस्तूंची जमवाजमव सुरू झाली आहे. या लोकोत्सवामुळे कणेरी मठाचे पर्यायाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर अधिक गडद होणार आहे म्हणून व्यवस्थापन समिती अहोरात्र झटत आहे. इतक्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी स्थानिकांचा या कार्यक्रमात सहभाग वाढविण्यासाठी व्यवस्थापन समिती गावागावात सुमंगलम् पंचमहाभूत लोक प्रसार सभा घेत आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणेकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. या संपूर्ण तयारीसाठी अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन करत आहेत. व्यवस्थापन समितीचे प्रमुख शंकर पाटील व डॉ. संदीप पाटील समिती सदस्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.