Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला भक्तीसागरात काळभैरव पालखी सोहळा

'चांगभलं'च्या गजरात पालखी डोंगराकडे रवाना

उद्या यात्रेचा मुख्य दिवस

यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता  

(छायाचित्र सौजन्य: मज्जिद किल्लेदार व अशपाक किल्लेदार.) 

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : 
"चांगभलं" च्या गजरात गडहिंग्लजला श्री काळभैरव देवाचा पालखी सोहळा  भाविकांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात पार पडला. सायंकाळी मिरवणुकीने पालखी डोंगराकडे रवाना झाली. उद्या (मंगळवार) यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील मंदिरात श्री काळभैरी पालखी आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. सायंकाळी पालखीचे पूजन पुजारी, प्रशासकीय अधिकारी व मानकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पार पडला. 'चांगभलं'च्या गजरात व गुलालाची उधळण करत भाविकांनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. मानाच्या सासनकाठ्यांना भाविकांनी गोंडे बांधून आपला नवस फेडला. यंदा मोठे गोंडे आकर्षण ठरले.  पालखी मार्गावर भाविकांनी आकर्षक रांगोळी काढली होती. नेहरू चौकात फुलांची काढलेली भव्य व आकर्षक रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरले. पालखी भोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 'चांगभलं'च्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत भाविकांनी श्री काळभैरव पालखीचे दर्शन घेतले.

शिवाजी चौकातून पालखी नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव चौकातून काळभैरी रोड वरून डोंगराकडे रवाना झाली. रात्री बारा वाजता श्री काळभैरवाची शासकीय पूजा होणार आहे, त्यानंतर पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे.

उद्या मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी यात्रा होत असल्याने  महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागासह सिंधुदुर्ग व गोवा येथील लाखो भाविक यात्रेसाठी दाखल होण्याची शक्यता आहे. सर्व भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन केले आहे. खास यात्रेसाठी गडहिंग्लज आगाराने देखील एसटी बसेसची सोय केली असून दिवसभर या बसफेऱ्या सुरू राहणार आहेत.

भाविकांसाठी तीन वैद्यकीय पथकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांनी यात्रेचे सुयोग्य नियोजन केले असून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याकडे लक्ष ठेवून आहेत. भाविकांच्या सोयीसाठी गडहिंग्लज आगाराने यात्रास्थळी तात्पुरते बस स्थानक उभारले आहे. यात्रेसाठी यंदा गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.