आजरा येथे गिरणी कामगारांचा मेळावा संपन्न
महामोर्चाच्या तयारीसाठी तालुकावार मेळाव्यांचे आयोजन
आजरा : गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत या मागणीसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीने दिनांक १२ मार्च रोजी ठाणे येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आजरा येथे झालेल्या मेळाव्यात देण्यात आली. महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला.
आजऱ्यातील सर्व श्रमिक कार्यालयात गिरणी कामगार वारसदार यांचा मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी कॉ. शिवाजी सावंत होते. प्रास्ताविक कॉ. पद्मिनी पिळणकर यांनी केले. यावेळी कॉ. शांताराम पाटील, कॉ. गोपाळ गावडे, कॉ. कृष्णा चौगुले, कॉ.लक्ष्मण कमते यांची भाषणे झाले.
गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे यासाठी सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने २००५ पासून महाराष्ट्रभर गिरणी कामगारांचा लढा सुरू आहे. आजपर्यंत अनेक आंदोलने शासन दरबारी करण्यात आली आहेत. अजूनही आंदोलने सुरूच आहेत. तरीही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यासाठी या महामोर्चाच्या आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या महामोर्चाच्या तयारीसाठी प्रत्येक तालुक्यात मिळावे घेण्याचे ठरविण्यात आले.
यासाठी चंदगडला अडकूर येथील रवळनाथ मंदिर येथे १ मार्च रोजी, राधानगरी तालुक्यासाठी मुदाळ तिट्टा येथे ३ मार्च रोजी, कागल येथे ४ मार्च रोजी तर गडहिंग्लजला ५ मार्च रोजी राम मंदिर येथे मेळावा घेण्यात येणार आहे.
या मेळाव्यात कॉ.नारायण भडांगे, हनुमंत खामकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कृष्णा खोराटे, राणबा पाटील, निवृत्ती मिसाळ, दौलती राणे, कृष्णा नार्वेकर, शांता राणे यांच्यासह गिरणी कामगार व वारसदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार गोपाळ गावडे यांनी मानले.


