कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीने पुन्हा छापा टाकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत.
गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने कागलमध्ये वातावरण तापले आहे. दरम्यान शुक्रवारीच उच्च न्यायालयाने आमदार मुश्रीफ यांना दिलासा दिला होता. शनिवारी पुन्हा ईडीची कारवाई झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून आक्रमक बनले आहेत. कार्यकर्त्यांना माहिती मिळताच आमदार मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.
"आम्हाला गोळ्या घालून जा" : सायरा मुश्रीफ
आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यानी भल्या पहाटे छापेमारी केल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक बनले असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. कार्यकर्ते प्रचंड आक्रमक बनले असून ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध नोंदविला. दरम्यान, आमदार मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी "आम्हाला गोळ्या घालून जा" अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.



