Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'मनसे'च्या आंदोलनानंतर अयोध्यानगर चौकातील "तो" खड्डा पालिकेने मुजविला

मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी चक्क खड्ड्यात बसूनच केले होते अनोखे आंदोलन

येथील महिलांनी सदर खड्ड्याचे औक्षण करत केली होती गांधीगिरी 


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथे अयोध्यानगर येथील चौकात पडलेला खड्डा मनसेच्या अनोख्या आंदोलनानंतर पालिकेने तातडीने मुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला.  

अयोध्यानगर येथे चौकात पालिकेने पाईपलाईन गळती कामासाठी रस्त्यावर खोदाई केली होती. यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र गेले महिनाभर हा खड्डा असाच राहिल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परिणामी वाहतुकही धोक्याची बनली होती. या खड्ड्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. तसेच या खड्ड्यात पाणी साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता.

अयोध्यानगर परिसरात सतत रहदारी असते. बाळूमामा मंदिराकडे जाण्यासाठी भाविक वाहनावरून सतत ये-जा करत असतात. मात्र या खड्ड्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला होता. याकडे येथील नागरिकांनी पालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र दुर्लक्ष झाल्याने ही समस्या "जैसे थे"  होती.

दरम्यान, येथील नागरिकांनी या प्रश्नाकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर श्री.चौगुले यांनी सदर खड्ड्यातच बसून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या परिसरातील महिलांनी या खड्ड्याचे औक्षण करत गांधीगिरी केली. मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सदर खड्ड्यात बसूनच आक्रमक होत आंदोलन केले. पालिकेने तातडीने हा खड्डा न मुजविल्यास सदर खड्ड्याची माती व दगड पालिकेत आणून ओतण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर  या आंदोलनाची दखल घेत पालिकेने तातडीने हा खड्डा मुजविला तसेच अयोध्या पार्कचीही साफसफाई करण्यात आली. मनसेने आंदोलन करत अयोध्यानगर मधील नागरिकांची समस्या सोडवल्याने समाधान व्यक्त होत आहे.

गडहिंग्लज: मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी अयोध्यानगर चौकातील सदर खड्ड्यात बसून असे अनोखे आंदोलन केले होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.