आजरा : "बरचं काही फौंडेशन" सरनोबतवाडी (ता.करवीर) यांच्या वतीने मडिलगे (ता.आजरा) येथील डॉ. महादेव ज्ञानदेव ढोकरे यांना "समाजरत्न पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथे छत्रपती शाहू सभागृहामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
समाजामध्ये प्रसिद्धीपासून अलिप्त असणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचे कार्य पुढे चालू राहण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप पडावी या उद्देशाने समाजसेवेत व्यस्त असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनचे अध्यक्ष संदीप संकपाळ यांच्या पुढाकाराने हे कार्य चालू आहे.
डॉ. महादेव ढोकरे यांनी आजवर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोविड काळात रुग्णांच्या घरी जाऊन दिलेल्या सेवा, तसेच आजवर सर्पदंश झालेल्या व्यक्तीना प्रसंगी तोंडाने विष काढून जीवदान दिले आहे. त्यांनी वेळेवर केलेल्या प्राथमिक उपचारांमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. गोरगरीब व्यक्तींना आरोग्य सेवा देण्यातही त्यांचा पुढाकार असतो याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. असे सेवाभावी वृत्तीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर व्यक्तींनाही यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये ग्रंथपाल अनिल कलकुटकी, पोलीस पाटील- तानाजी कुरळे, पत्रकार सुनील दिवटे, ज्येष्ठ लेखक लक्ष्मण द्रविड, विठ्ठल कदम, विठ्ठल भिउंगडे, शिवाजी पाटील, सचिन पोवार, कल्पना भाईंगडे, विलास माळी, मुकुंद कांबळे,सुरज बागडी, संतोष माने, सुरज बळीराम पुजारी, सुनीता देवकर, रूपाली जाधव, शिवाजी आनावरे, काळूराम लांडगे, गजानन पाटील, प्रवीण कांबळे इत्यादींना सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी निर्मिती विचार मंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, कीर्ती मसुटे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, श्रीपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


