पर्यावरण रक्षणासाठी नगरपरिषदेची जनजागृती
![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज नगरपरिषदेमार्फत 'माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत नगरपक्षी म्हणून भव्य चिमणी प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी या माध्यमातून पालिकेने केलेली जनजागृती निश्चितच कौतुकास्पद आहे.
गडहिंग्लज नगपरिषद मार्फत माझी वसुंधरा अभियान ३,० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेकडे वृक्षप्राधिकरण समिती कार्यरत आहे. समितीमार्फत तसेच माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरात पर्यावरण बाबत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
![]() |
| (छायाचित्र: मज्जिद किल्लेदार) |
नगरपरिषदेने सन २०१६ ह्या वर्षी गडहिंग्लज नगरपक्षी म्हणून चिमणी घोषित करण्यात आला आहे. दि.२० रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर आज गडहिंग्लज नगरपरिषदेमार्फत चिमणी प्रतिकृती अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य यांच्या करिता चिमणी जनजागृती करण्यासाठी बिल्ले तयार करून वाटप करण्यात आले. सदरचा उपक्रम पर्यावरणाला चालना देणारा आहे. गडहिंग्लज शहरातील मूर्तीकार तथा चित्रकार रमण लोहार यांनी चिमणीची प्रतिकृती तयार करून दिली. नगरपरिषद वाचनालय या ठिकाणी भव्य चिमणी प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी स्वरूप खारगे, वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नरेंद्र भद्रापूर, धोंडीबा काटकर, अनंत पाटील, अनिल मगर, आप्पासो पाटील, विकास साठे, सागर पाटील, सौ. रेश्मा कांबळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करून गडहिंग्लज नगरपक्षी चिमणीची प्रतिकृती बसविल्याने गडहिंग्लज शहराची जैव विविधता समृद्ध करण्यास सहकार्य होणार असल्याचे सांगितले.



