शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी केले अभिनंदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या एम.ए.मराठीचे विद्यार्थी संकेत कृष्णात पाटील, रणजीत राजाराम कागणकर निमगाव (ता.मालेगाव) येथील कर्मवीर भाऊराव हिरे महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय काव्य वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून कर्मवीर काव्य करंडकाचे मानकरी ठरले. या यशाबद्दल शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संकेत पाटील यांनी 'विद्रोह' रणजीत कागणकर यांनी 'कवितेस कारण की..' हि कविता सादर केली. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांना माजी मंत्री प्रशांत हिरे, कवी विजय चोरमारे, संस्थेचे समन्वयक अपूर्व हिरे या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ९० हून अधिक स्पर्धेत सहभागी झाले होते. संकेत व रणजीत यांनी महाराष्ट्राच्या नामांकित स्पर्धेमध्ये आपल्या वक्तृत्वाची व काव्यवाचनाची छाप पाडली आहे. रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर कॉलेजमध्ये नुकताच वक्तृत्व स्पर्धेत नामांकित गोगटे-जोगळेकर करंडक पटकाविला. महर्षी दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे -प्रथम क्रमांक, अकोला येथील नामांकित छत्रपती करंडक स्पर्धेत त्यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. विचार क्रांती युवा वक्ता २०२३ या स्पर्धेत युवा वक्ता पुरस्कार पटकाविला.
'फासालाही कळले शेती जुगार आहे....,' 'जे सत्य, सुंदर, सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे' .... तसेच “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' नवीन शैक्षणिक धोरण, या विषयावर विविध स्पर्धेतून आपल्या वक्तृत्वाची मोहर उमटविली. या विद्यार्थ्यांनी २ नामांकित करंडक, २० ट्रॉफी व ३५ हून अधिक स्पर्धेतून बक्षिसे पटकाविली आहेत. त्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांचे प्रोत्साहन तर मराठी विभाग प्रमुख डॉ.मनमोहन राजे, प्रा.अशोक मोरमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.



